अजित काळेल  ( सातारा जिल्हा संपादक )

    भुईज  (  जि.सातारा )भुईंज येथे २३ फेब्रुवारी २०२० रोजी रात्री सुमारे २ वाजण्याच्या सुमारास अल्पवयीन मुलीस चॉकलेटचे आमिष दाखवून अपहरण करून तिला बेकायदेशीररीत्या डांबून ठेवून मारहाण केल्याप्रकरणी आरोपी मधुकर संपत यादव यास न्यायालयाने दोषी ठरवत पाच वर्षे सश्रम कारावास व १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

या प्रकरणात आरोपीने अल्पवयीन पीडितेस तिच्या कायदेशीर पालकांच्या परवानगीशिवाय घराच्या माडीवर नेऊन दरवाजा बंद करून तिला डांबून ठेवले. पीडिता घाबरून ओरडू लागल्यावर आरोपीने तिच्या तोंडावर व ओठांवर मारहाण करून भिंतीवर ढकलून दिले. या घटनेबाबत फिर्यादीने दिलेल्या खबरीवरून भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान भुईंज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. श्याम विनायक बुवा यांनी तपास पूर्ण करून माननीय न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदर खटल्याची सुनावणी मा. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश श्री. आर. एन. मेहरे (वाई) यांच्या न्यायालयात पूर्ण झाली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता श्री. दयाराम एस. पाटील व सहाय्यक सरकारी अभियोक्ता श्री. एस. यु. शिंदे यांनी कामकाज पाहिले.

या खटल्यात एकूण ८ साक्षीदार तपासण्यात आले. परिस्थितीजन्य पुरावे व साक्षीदारांच्या साक्षींच्या आधारे न्यायालयाने आरोपीस भारतीय दंड संहिता कलम ३६३, ३४२ व ३२३ अन्वये दोषी ठरवले.

या प्रकरणात उपविभागीय पोलीस अधिकारी वाई श्री. सुनील साळुंखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. पृथ्वीराज ताटे, तपासी अधिकारी श्री. श्याम विनायक बुवा, पैरवी अधिकारी श्री. अविनाश ढेरे (स. पो. फौ.) यांच्यासह पोलीस प्रॉसिक्युशन स्कॉड व भुईंज पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
न्यायालयाच्या या निर्णयामुळे अल्पवयीनांवरील गुन्ह्यांबाबत कठोर संदेश गेला असून पीडितेला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *