चांगदेव काळेल ( सातारा जिल्हा संपादक )
भुईंज / गर्दीच्या बाजारपेठा आणि सततची नागरिकांची वर्दळ यामुळे वाढलेल्या मोबाईल गहाळ प्रकरणांवर भुईंज पोलिसांनी प्रभावी प्रहार करत तब्बल ६ लाख ७० हजार रुपये किमतीचे ३० स्मार्टफोन हस्तगत केले आहेत. तांत्रिक कौशल्य, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि समन्वयाच्या बळावर उभी राहिलेली ही कारवाई नागरिकांसाठी दिलासादायक ठरली आहे.
भुईंज व पाचवड या मुख्य बाजारपेठांमध्ये तसेच परिसरातील गावांमधून मोठ्या प्रमाणावर नागरिकांची ये-जा असते. प्रवासादरम्यान किंवा खरेदीच्या गर्दीत मोबाईल गहाळ होण्याच्या तक्रारी वाढत होत्या. या पार्श्वभूमीवर भुईंज पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेत गहाळ मोबाईलचा शोध सुरू केला.

पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि वाई विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी डी.बी. पथकाला स्पष्ट सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस कॉन्स्टेबल आकाश कुंभार व सागर मोहिते यांनी सीईआयआर (CEIR) पोर्टल व अन्य तांत्रिक साधनांच्या मदतीने महाराष्ट्रासह परराज्यातील मोबाईल धारकांशी संपर्क साधत तपासाची साखळी मजबूत केली.
सततचा पाठपुरावा आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे एकूण ३० मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले. विशेष म्हणजे, यामध्ये आयफोन १४ प्रो मॅक्ससारखा उच्च किमतीचा मोबाईलही समाविष्ट आहे.
ही कारवाई पृथ्वीराज ताटे (सहाय्यक पोलीस निरीक्षक), पंतग पाटील व सुरेश शिंदे (पोलीस उपनिरीक्षक), तसेच टकले, नितीन जाधव, कोलवडकर, वाघमळे, रमेश बरकडे, बल्लाळ आणि निंबाळकर यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पूर्ण केली.

गहाळ मोबाईल शोध मोहीम यापुढेही अधिक वेगाने राबविण्यात येणार असल्याचे प्रभारी अधिकारी पृथ्वीराज ताटे यांनी स्पष्ट केले. पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत असून, गहाळ वस्तूंबाबत तत्काळ तक्रार नोंदविण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
