नेताजी खराडे (दौंड तालुका प्रतिनिधी )
केडगाव : ( ता. दौंड )
राज्यात विकासकामांसाठी निधी अपुरा असल्याची कुरकुर सुरू असताना दुसरीकडे शासन आणि प्रशासनाच्या हलगर्जीमुळे कोट्यवधी रुपयांचा अपव्यय सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. खडकवासला पाटबंधारे विभागातील अनेक अधिकारी सहा/सहा महिन्यांपासून प्रत्यक्ष पदावर हजर झालेलेच नसून, घरबसल्या लाखो रुपयांचा पगार घेत असल्याचा प्रकार समोर आला आहे. शासन या सहा महिन्यांत त्यांच्यावर सहा ते सात कोटींची उधळपट्टी करत आहे.
राज्य शासनातील अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेतील ‘अर्थपूर्ण खेळ’ सर्वपरिचित आहे. एखाद्या पदावर पोहोचण्यासाठी मोठी रस्सीखेच, व्यवहार, नियुक्ती झाल्यानंतर इच्छित ठिकाणी बदलीसाठी सुरू होणारी धडपड हे सगळे नवीन नाही. काही अधिकारी तर नियुक्ती झालेल्या जागी रुजून होणे, मूळ पदभार न सोडणे अशा मार्गांनी आपल्याला हवा तशा
तैनातीचे ठिकाण मिळेपर्यंत ‘खेळ’ सुरूच ठेवतात.
यावर्षी पाटबंधारे विभागातील शाखाधिकाऱ्यांच्या बदल्या मोठ्या प्रमाणात झाल्या. अनेकांनी स्वतःचे ‘स्थान’ सुरक्षित केले; तर अनेक जण वेटिंग लिस्टमध्ये अडकले. मनासारखी नियुक्ती न मिळाल्याने काहीजण कागदोपत्री रुजू झाले पण जागेवर कधीच थांबले नाहीत कारण त्यांची नियुक्ती लांब कुठेतरी करण्यात आली. या अधिकाऱ्यांना नावापुरते पद, काम नाही, जबाबदारी नाही; परंतु पगार मात्र नियमित आहे. असेच एक पद सिद्धार्थ शेवरे यांना केडगाव शाखेमध्ये लाभले आहे.
प्रत्येक शाखाधिकाऱ्याचा सरासरी पगार दरमहा पन्नास हजार रुपये मानल्यास, एक महिन्याला एक कोटीहून अधिक रुपयांचा पगार शासनाला बसतो. सहा महिन्यांत ही रक्कम सात ते आठ कोटींवर पोहोचते. जनतेच्या पैशातून दिला जाणारा हा फुकट पगार नेमका कोणाच्या निष्काळजीपणामुळे, हा प्रश्न जनमानसात तीव्रतेने उपस्थित होऊ लागला आहे. एकीकडे पाटबंधारे विभागातील अनेक कार्यालयांत अधिकाऱ्यांच्या तुटवड्यामुळे कामकाजावर परिणाम होत असतानाच, दुसरीकडे केडगावचे शाखाधिकारी सिद्धार्थ शेवरे मात्र फुकट पगारावर घरी आराम करत असल्याची स्थिती आहे.
