परंडा, जि. धाराशिव —
“वाचनाशिवाय ज्ञानप्राप्ती अशक्य आहे. जगातील कोणतीही माहिती, विचार किंवा संशोधन समजून घेण्यासाठी वाचन हीच खरी गुरुकिल्ली आहे. देशातील महान नेत्यांचे विचार आत्मसात करण्यासाठी, समाजातील अन्याय, अत्याचार, अंधश्रद्धा व कायद्याची माहिती जाणून घेण्यासाठी वाचन अत्यावश्यक आहे,” असे प्रतिपादन शिक्षण महर्षी गुरुवर्य रा. गे. शिंदे महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. शहाजी चंदनशिवे यांनी केले.
श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा. गे. शिंदे महाविद्यालय, परंडा येथे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त “वाचन प्रेरणा दिन” उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपप्राचार्य डॉ. महेशकुमार माने व संस्थेचे प्रशासकीय अधिकारी भाऊसाहेब दिवाने यांच्या हस्ते डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यानंतर डॉ. शहाजी चंदनशिवे यांनी उपस्थित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधत सांगितले की, “आजच्या डिजिटल युगात लोक वाचनापासून दुरावत आहेत, परंतु खरे ज्ञान फक्त वाचनातूनच मिळते. अब्दुल कलाम यांचे जीवनचरित्र हे प्रेरणादायी आहे. त्यांनी आयुष्यभर वाचन आणि शिक्षणाला सर्वोच्च स्थान दिले. त्यांच्या विचारांमधून प्रत्येक विद्यार्थ्याने प्रेरणा घ्यावी.”
या प्रसंगी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी भाऊसाहेब दिवाने, गणित विभाग प्रमुख डॉ. विद्याधर नलवडे, ग्रंथपाल डॉ. राहुल देशमुख, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. संतोष काळे, प्रा. तानाजी फरतडे, प्रा. वरपे, तसेच कार्यालयीन अधीक्षक श्रीमती पद्मा शिंदे उपस्थित होते.
तसेच शिक्षकेतर कर्मचारी अनिल जानराव, वसंत राऊत, भागवत दडमल, विशाल नलवडे, रामराजे जाधव, दत्ता आतकर यांच्यासह कनिष्ठ आणि वरिष्ठ विभागातील विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी “दररोज काहीतरी नवीन वाचण्याची सवय लावून घेण्याचा संकल्प” केला.
“वाचन हेच खरे आत्मविकासाचे शस्त्र आहे,” — डॉ. शहाजी चंदनशिवे
