नेताजी खराडे ( दौंड तालुका प्रतिनिधी )

दिव्यांग व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी; पाटस पोलीस चौकीत गुन्हा दाखल
पाटस (ता. दौंड) : पाटस येथील गाव तलावावरील अतिक्रमणाच्या वादातून एका दिव्यांग व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी साहिल वसंत पानसरे याच्याविरुद्ध पाटस पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाटस येथील कारखाना रस्त्यावर मोबाईल शॉपी चालवणारे दिव्यांग व्यावसायिक परशुराम दशरथ केकाण (वय ३०, रा. केकाण वस्ती, पाटस) हे शुक्रवार (दि. २६) रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास आपल्या दुकाना समोरील हॉटेलजवळ बसले होते. यावेळी साहिल वसंत पानसरे (रा. कारखाना रस्ता, तलावाशेजारी, पाटस) हा कारखान्याच्या बाजूने दुचाकीवरून आला. केकाण यांच्याजवळ गाडी थांबवून त्याने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. तसेच, “लंगड्या, तू माझ्या डोक्यात आहेस, मी तुला सोडणार नाही, तुला मारणारच आहे,” अशी धमकी देत तो निघून गेला.

या घटनेत साहिल पानसरे याने केकाण यांच्या दिव्यांगपणाचा अवमान करत सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याने परशुराम केकाण हे भयभीत झाले. त्यांनी तातडीने पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर पाटस पोलीस चौकीत साहिल वसंत पानसरे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम २९६, ३५२, ३५१ (२)(३) तसेच अपंग व्यक्तींचा अधिकार अधिनियम २०१६ मधील कलम ९२(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल नुतनकुमार जाधव करीत आहेत.

परशुराम केकाण हे गेल्या १५ वर्षांपासून पाटस येथील कारखाना रस्त्यावर गावतलावाच्या हद्दीत मोबाईल शॉपी चालवत असून त्याच व्यवसायावर त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. सदर दुकानाच्या जागेवरून केकाण व पानसरे कुटुंबीयांमध्ये वाद सुरू असून तो सध्या दौंड तहसीलदार यांच्याकडे प्रलंबित आहे. जन्मत:च दोन्ही पायांनी ८० टक्के दिव्यांग असलेले परशुराम केकाण हे गावात अतिशय शांत, सुस्वभावी व्यक्ती म्हणून ओळखले जातात. मात्र अचानक मिळालेल्या या जीवे मारण्याच्या धमकीमुळे ते सध्या भीतीच्या छायेत वावरत असून नागरिकांमध्येही संताप व्यक्त होत आहे.

दिव्यांग व्यक्तीचा अपमान करून त्याला धमकावण्याचा प्रकार अत्यंत गंभीर असून आरोपीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *