नेताजी खराडे ( दौंड तालुका प्रतिनिधी )
यवत | प्रिंट आणि डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न
पाटस : सतत धावपळ, सामाजिक प्रश्नांचा मागोवा, तातडीचे वृत्तांकन आणि २४ तासांची धकाधकीची दिनचर्या… या सगळ्यात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होण्याची सर्वांत मोठी शक्यता असते ती पत्रकारांची. हाच मुद्दा ओळखून प्रिंट आणि डिजिटल मीडिया पत्रकार संघातर्फे यवत येथे भव्य आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. बुधवारी (दि. १०) संपन्न झालेल्या या शिबिराला स्थानिक पत्रकार बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
पत्रकार बांधवांचे आरोग्य जपण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिरात विविध रक्त तपासण्या, ईसीजी, एक्स-रे यांसह आवश्यक औषधोपचारही करण्यात आले. धकाधकीच्या वृत्तजीवनात स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ काढू न शकणाऱ्या पत्रकारांना या शिबिरामुळे महत्त्वपूर्ण सुविधा उपलब्ध झाल्या.
यवत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. किशोर पत्की व त्यांच्या संपूर्ण वैद्यकीय टीमने शिबिरासाठी विशेष सहकार्य व उत्कृष्ट वैद्यकीय सेवा पुरवली. त्यांच्या समन्वयामुळे आणि तत्पर सेवेमुळे शिबीर यशस्वीरीत्या पार पडले. उपस्थित पत्रकारांनी डॉ. पत्की व संपूर्ण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानले.
आरोग्य तपासणी शिबिरामुळे पत्रकारांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होऊन “इतरांसाठी धावणाऱ्यांनी स्वतःकडेही लक्ष द्यावे” हा सकारात्मक संदेश समाजापर्यंत पोहोचला आहे.




