चांगदेव काळेल ( सातारा जिल्हा संपादक )

धोम (ता. वाई) येथील बौद्ध वस्तीत मंजूर असलेल्या समाजमंदिराच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार, मनमानी आणि प्रशासकीय दुर्लक्ष समोर आले असून, या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्हा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सातारा जिल्हा परिषद बांधकाम उत्तर विभागामार्फत मंजूर झालेल्या समाजमंदिराचे काम मक्तेदार साहिल वखारकर (सब-कॉन्ट्रॅक्टर) यांच्याकडे देण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात बांधकाम सुरू करण्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या सुमारे २७,०२९ चौरस फूट क्षेत्रफळाच्या जुन्या इमारतीचे कोणतेही अधिकृत निर्लेखन न करता, त्यावरील कौले, सागवानी तुळया, जुन्या काळातील दगड व इतर अंदाजे ७ ते ८ लाख रुपयांचे साहित्य परस्पर वापरल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

या गैरप्रकारात वाई महसूल खात्याचे सर्कल अधिकारी विश्वनाथ कांबळे यांची थेट भूमिका असल्याचा आरोप असून, मक्तेदाराशी संगनमत करून समाजमंदिराची मंजूर जागा बदलून मनमानी पद्धतीने काम सुरू असल्याचे सरपंचांनी नमूद केले आहे. विशेष म्हणजे, ग्रामपंचायत प्रशासनास विश्वासात न घेता काम सुरू असून, चुकीच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेऊन, कथित खोट्या सह्या व बनावट ठराव करण्यात आल्याचेही आरोप करण्यात आले आहेत.

सरपंचांनी या प्रकरणाबाबत वारंवार पत्रव्यवहार करूनही गटविकास अधिकारी विजय परीट, पंचायत समिती वाई व संबंधित अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात असल्याचा आरोप केला आहे. “मी सरपंच या नात्याने शासन दरबारी प्रयत्न करून हे काम मंजूर करून आणले, मात्र आज त्याच कामात ग्रामपंचायतीलाच डावलले जात आहे,” अशी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

या सर्व कारभाराविरोधात सरपंचांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा दिला असून, “न्याय न मिळाल्यास होणाऱ्या सर्व परिणामांना प्रशासन जबाबदार राहील,” असे स्पष्ट शब्दांत नमूद केले आहे.
धोम येथे सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर कामाची जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः पाहणी करावी, संबंधित अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून तात्काळ निलंबन करावे, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनाच्या प्रती पोलीस अधीक्षक, शहर पोलीस ठाणे, जिल्हा परिषद, पंचायत समिती वाई, तहसीलदार वाई, तसेच राज्यातील वरिष्ठ मंत्री व विभागीय आयुक्त पुणे यांना पाठवण्यात आल्या आहेत.

प्रश्न एकच आहे  सार्वजनिक समाजमंदिराचे काम खासगी फायद्यासाठी वळवले जात असेल, तर प्रशासन गप्प का?
धोम समाजमंदिर प्रकरणावर आता जिल्हा प्रशासन काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *