नेताजी खराडे ( दौंड तालुका प्रतिनिधी )

दौंड तालुक्यातील पाटेठाण गावात आज शहिद जवान नितीन मारूती पाबळे यांच्या ३२व्या पुण्यस्मरणानिमित्त भावपूर्ण वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या या वीर जवानाच्या स्मृतींना उजाळा देताना संपूर्ण गावात देशभक्ती व अभिमानाची भावना दिसून आली.
कार्यक्रमाची सुरुवात शहिद जवान नितीन पाबळे यांच्या पुतळ्यासमोर ध्वजारोहन व सलामी देऊन करण्यात आली. यावेळी उपस्थित आजी-माजी सैनिकांनी शिस्तबद्ध पद्धतीने सलामी देत शहिदाला मानवंदना अर्पण केली. त्यानंतर ह.भ.प. संतोष महाराज बुरकूल यांच्या हस्ते विनम्र आदरांजलीपर किर्तनरूपी सेवा संपन्न झाली. या कीर्तनातून देशसेवा, त्याग आणि बलिदानाचे महत्त्व प्रभावी शब्दांत मांडण्यात आले.
या कार्यक्रमाला समस्त पाबळे परिवार, पाटेठाण ग्रामस्थ, विविध सामाजिक व राजकीय पदाधिकारी, शाळेतील विद्यार्थी व शिक्षक, प्रमुख पाहुणे, तसेच आजी-माजी सैनिक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी शहिद जवानाच्या कार्याविषयी मनोगत व्यक्त करत देशासाठी सेवा करण्याची प्रेरणा घेतली.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी शहिद जवान नितीन मारूती पाबळे यांच्या स्मृतीस अभिवादन करून त्यांच्या बलिदानाचा आदर्श पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प केला. पाटेठाण गावाने पुन्हा एकदा देशभक्तीची परंपरा जपली असून, शहिद जवानाचे स्मरण कायम प्रेरणादायी राहील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *