फुलसावंगी एसटी बसस्टॉपची दुरवस्था – प्रवाशांची गैरसोय, अपघाताचा धोका वाढला!
       श्याम शिंदे
महागाव तालुका प्रतिनिधी

महागाव तालुक्यातील फुलसावंगी हे तालुक्यातील सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक केंद्र असून, येथील बाजारपेठेत दररोज शेकडो प्रवासी ये-जा करतात. मात्र, राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) फुलसावंगी येथील प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था झाल्याने प्रवाशांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

स्थानिक नागरिक आणि प्रवाशांच्या मते, फुलसावंगी येथील एसटी प्रवासी निवारा व बस थांबा अत्यंत जीर्णावस्थेत असून, छप्पर तुटलेले, बसण्याची व्यवस्था नसलेली आणि परिसरात स्वच्छतेचा अभाव आहे. विशेष म्हणजे, अनेक वेळा बस या विरुद्ध दिशेने थांबत असल्याने अपघाताचा गंभीर धोका निर्माण होत आहे.

प्रवाशांचे म्हणणे आहे की, “एसटी बस नेहमी प्रवासी निवारापासून थोड्या अंतरावर किंवा उलट्या दिशेला थांबतात, त्यामुळे रस्ता ओलांडताना अपघाताची शक्यता वाढते. विशेषतः शालेय विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही परिस्थिती अत्यंत धोकादायक आहे.”

स्थानिक नागरिकांनी आणि प्रवाशांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडे लवकरात लवकर फुलसावंगी एसटी बस स्टॉपची दुरुस्ती करून प्रवासी निवाऱ्याची सुधारणा करण्याची मागणी केली आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, एसटी बस प्रवासी निवार्‍यासमोरच थांबावी, तसेच बसथांब्याची स्पष्ट निशाणी, बसण्याची सोय आणि सुरक्षित पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

जर ही मागणी लवकरात लवकर पूर्ण करण्यात आली नाही, तर प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होईल आणि प्रशासनावर कारवाईची मागणी केली जाईल, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

Oct 28, 2025

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed