विशेष प्रतिनिधी  8459177802

बेवनूर (ता. जत) —
ग्रामस्थांनी जपून ठेवण्यास दिलेल्या गायरानाची खुलेआम लूट सुरू असल्याचा धक्कादायक आरोप समोर आला असून, या लुटीच्या केंद्रस्थानी तलाठी आंबेकर व ठेकेदाराचे कथित संगनमत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. शासनाच्या लाखो रुपयांचा महसूल बुडवत गायरानातील मुरूम रात्रंदिवस उपसला गेला आणि तो थेट बेवनूर–जुनोनी रस्त्याच्या कामावर चढवण्यात आला—ही माहिती ग्रामस्थांनी दिली.
ग्रामपंचायतीकडे राखण दिलेला गायरान असा उघडपणे तुडवला जात असताना ग्रामपंचायत शांत बसली, हे ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार प्रशासनातील निष्काळजीपणाचं जिवंत उदाहरण ठरत आहे.
तलाठी-ठेकेदारांची सेटिंग?”गावकऱ्यांचा थेट सवाल
उत्खनन सुरू असताना तलाठी आंबेकर यांची सातत्यपूर्ण उपस्थिती व ठेकेदाराशी असलेली जवळीक पाहता
“हे सगळं संगनमतानेच होतं का?”
असा प्रश्न गावकऱ्यांच्या मनात सर्रास घुमू लागला आहे.
याआधीही तालुक्यात तलाठी आंबेकर यांच्या कारभाराविषयी चर्चा रंगत असल्याचा उल्लेख गावकरी करतात. तक्रारींचा पाऊस पडला तरीही तहसील प्रशासन बहिरेच राहिले, असा आरोप ग्रामीणांनी केला.
तहसीलदारांची चौकशी ‘कागदोपत्री’, कृती शून्य
गावकऱ्यांनी तलाठीविरोधात तक्रार देण्यासाठी तहसीलदारांकडे धाव घेतली असता त्यांना
“मंडल अधिकारी व मदतनीस देतो, चौकशी तातडीने लावतो”
असे आश्वासन मिळाले.
मात्र धक्कादायक बाब म्हणजे
१५ दिवस उलटले, पण चौकशीचा गंधही नाही!
ग्रामस्थांच्या तोंडून सरळ शब्दात आरोप
“तहसीलदारांनी आमचा अर्ज केराच्या टोपलीतच टाकला.”
न्यायासाठी गावकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे कूच!
तालुका प्रशासनाकडून सतत दरवाजे बंद होत असल्याने बेवनूरचे संतापलेले ग्रामस्थ आता जिल्हाधिकारी सांगली यांच्याकडे न्यायासाठी जाणार आहेत.
संबंधित पत्रकाराने प्रांत व तहसीलदारांचा प्रतिसाद जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फक्त —
“चौकशी होईल…”
असे चारच शब्द काढले.
गायरानाच्या नावाखाली झालेल्या या कथित लुटीचा उलगडा होणार की पुन्हा फाईली धूळ खात बसणार?
गावकऱ्यांना न्याय मिळणार की सत्ता–प्रशासनाचा छत्रछाया खेळ पुन्हा सुरू राहणार?
सगळ्यांचे लक्ष आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे खिळले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed