चांगदेव काळेल ( सातारा जिल्हा संपादक )
बेवनूर (ता. जत, जि. सांगली) येथे तलाठी सौ. आंबेकर यांच्या कथित गैरकारभाराविरोधात ग्रामस्थ, शेतकरी व विद्यार्थ्यांनी तहसीलदारांना विस्तृत लिखित निवेदन सादर करत गंभीर तक्रारी नोंदवल्या. तलाठींच्या कामकाजात अवैध वसुली, HRA गैरव्यवहार, कार्यालयात खाजगी व्यक्तींमार्फत सुरू असलेले अनधिकृत काम, तसेच शासकीय नियमांचे सर्रास उल्लंघन अशा अनेक मुद्द्यांचा समावेश असून गावात मोठी नाराजी व्यक्त होत आहे.
अवैध रकमेची मागणी – शेतकऱ्यांचा संताप
निवेदनात ग्रामस्थांनी आरोप केला की सातबारा उतारे, खरेदी नोंदी, जमिनीचे प्रशासकीय कागदपत्रे, प्रमाणपत्रे यांसारख्या मूलभूत शासकीय सेवांसाठी हजारो रुपयांची अवैध मागणी केली जाते. पैसे दिल्यानंतरही कामे विलंबाने केली जात असल्याची तक्रार अनेकांनी मांडली.
मुख्यालयात न राहता HRA घर भाडे भत्ता घेतल्याचा संशय
ग्रामस्थांनी असा आरोप केला आहे की तलाठी आंबेकर या मुख्यालयापासून दूर राहत असूनही “मुख्यालयातच राहते” असे दाखवून घरभाडे भत्ता (HRA) घेतला जात आहे. यामुळे शासनाची दिशाभूल होत असून भत्ता व्याजासह वसूल करून गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
कार्यालयात खाजगी व्यक्तींमार्फत कामकाज?
कार्यालयीन नोंदी, उतारे, पत्रव्यवहार व इतर कागदपत्रे हाताळण्यासाठी खाजगी व्यक्तींना अनधिकृत प्रवेश देण्यात येत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यामध्ये ड्रायव्हर व एक खासगी महिला सहाय्यकाचा सहभाग असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
शासकीय नियमांचे उल्लंघन
निवेदनात पुढे कार्यालयात नियमित अनुपस्थिती, फोन न उचलणे, कार्यालयाच्या दर्शनी भागात आवश्यक माहिती न लावणे या स्वरूपातील शिस्तभंग तक्रारीही नोंदवण्यात आल्या आहेत.
ग्रामस्थांच्या चार प्रमुख मागण्या
1. त्वरित प्राथमिक शिस्तभंग कारवाई
2. स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी
3. आरोप सिद्ध झाल्यास निलंबन व कायदेशीर कारवाई
4. शेतकरी व नागरिकांना न्याय आणि पारदर्शक सेवा
तहसीलदारांचा प्रतिसाद – “सर्कल अधिकारी व मदतनीस चौकशीसाठी पाठवू”
निवेदन स्वीकारताना तहसीलदारांनी ग्रामस्थांना आश्वासन दिले की संबंधित तलाठींची चौकशी करण्यासाठी सर्कल अधिकारी आणि एक मदतनीस तात्काळ पाठवले जातील तसेच नागरिकांकडे असलेले पुरावे चौकशी पथकाला सादर करण्याचे आवाहन त्यांनी केले.
वेळीच कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन
योग्य कारवाई न झाल्यास तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
समस्त ग्रामस्थ बेवनूर यांच्या स्वाक्षरीने हे निवेदन जिल्हाधिकारी सांगली व उपविभागीय अधिकारी जत यांनाही पाठविण्यात आले आहे.
