चांगदेव काळेल ( सातारा जिल्हा संपादक )
सातारा : मराठा समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी सुरू करण्यात आलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळात गंभीर स्वरूपाचा गैरकारभार सुरू असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख श्री. सचिन सुभाष मोहिते यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी थेट उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री मा. अजितदादा पवार यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करत तत्काळ चौकशी व कठोर कारवाईची मागणी केली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून महामंडळाच्या विविध योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता दिसून येत असून, ट्रॅक्टर कर्जवाटप, वाहन कर्ज योजना अचानक बंद, तसेच व्याज परतावा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ६ ते ८ महिने पैसे न मिळणे, महामंडळाची नोंदणी जाणीवपूर्वक बंद ठेवणे असे प्रकार सातत्याने सुरू असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रकारांमुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या मराठा समाजावर मोठा अन्याय होत आहे.
“मराठा समाजाला थोडीफार दिलासा देणाऱ्या या महामंडळालाच ग्रहण लागले की काय?” असा संतप्त सवाल उपस्थित करत, सरकारच मराठा समाजाच्या योजनांना हरताळ फासत आहे का? असा थेट आरोप मोहिते यांनी केला आहे. या गैरकारभारामुळे समाजात प्रचंड असंतोषाचे व दूषित वातावरण निर्माण झाले असून, परिस्थिती चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, या प्रकरणाची तत्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई न झाल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सातारा जिल्ह्याच्या वतीने संबंधित महामंडळाला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे कोणतेही शासकीय अथवा इतर नुकसान झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी महामंडळाचे अधिकारी व प्रशासनाची राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
या गंभीर आरोपांमुळे सातारा जिल्ह्यासह संपूर्ण मराठा समाजात संतापाची लाट उसळली असून, राज्य सरकार आता या प्रकरणात काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रसंगी उपस्थित तालुका प्रमुख सुनील पवार ,सागर रायते, रुपेश वंजारी, रवी भणगे, इम्रान बागवान, अक्षय वाघमारे अभिजीत बनसोडे चंदन कदम , अमर देटे इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते ,
