गुलाब शेख (उपसंपादक महाराष्ट्र राज्य )
मुखेड, ता.—
मुखेड नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून, शहरातील प्रभागनिहाय काँग्रेसच्या कॉर्नर बैठकींमध्ये मतदारांची उत्स्फूर्त उपस्थिती पाहायला मिळाली. या बैठकीत बोलताना खा. प्रा. रविंद्रजी चव्हाण यांनी मतदारांना काँग्रेसच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे जोरदार आवाहन केले.
“३०–३५ वर्षांची एकाधिकारशाही संपवा” — खासदार चव्हाण
खासदार चव्हाण म्हणाले,
“गेल्या तीन दशकांपासून एकाच कुटुंबाची मक्तेदारी असलेल्या मुखेड नगरपरिषदेची सत्ता आता बदलण्याची वेळ आली आहे. सामान्यांच्या हितासाठी, विकासाच्या दृष्टीने हा बदल अत्यंत आवश्यक आहे.”
त्यांनी पुढे काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. सौ. दिपाली श्रावण रॅपणवाड यांचे विशेष कौतुक करत म्हटले की त्या सुशिक्षित, स्पष्टवक्त्या आणि सर्व समाजघटकांसाठी ध्येयाने काम करणाऱ्या उमेदवार आहेत.
“धनशक्ती नाही… जनशक्ती जिंकेल” — माजी आमदार हणमंतराव पाटील
या बैठकीत माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी भावनिक साद घालताना सांगितले की,
“काँग्रेसने सामान्यांमध्ये मिसळणारे, हाकेला धावून येणारे, वार्डातील समस्या जाणणारे खऱ्या अर्थाने कार्यकर्ते उमेदवार दिले आहेत. धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती उभी राहिली तर विजय नक्की आहे.“संविधान धोक्यात; मुस्लिम–दलित–ओबीसी मतदारांनी विचारपूर्वक मतदान करा” — सुरेशदादा गायकवाड
बहुजन-दलित चळवळीचे नेते सुरेशदादा गायकवाड यांनी भाषणात सध्याच्या राजकीय स्थितीवर टीका करत चेतावणी दिली की,
“केंद्र–राज्यातील भाजपा सरकार दंडेलशाही वाढवत आहे. जातीय फूट पसरवली जात आहे. संविधान सुरक्षित नाही. मुस्लिम, दलित, ओबीसी बंधूंनी भविष्याची दिशा ठरवणारे मतदान करणे अत्यावश्यक आहे.”
“काँग्रेसचे व्हिजन स्पष्ट – विकासाचा रोडमॅप तयार” — दिलीप पाटील बेटमोगरेकर
जिल्हा परिषद माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर म्हणाले की,
“महिलांसाठी खुल्या असलेल्या नगराध्यक्ष पदासाठी ओबीसी समाजातील सशक्त चेहरा म्हणून डॉ. दिपालीताई रॅपणवाड यांना उभे करून काँग्रेसने भविष्यातील विकासाचे स्पष्ट व्हिजन जनतेसमोर ठेवले आहे.”
तसेच सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी तरुण वर्गासह सर्व मतदारांना केले.
प्रमुख नेत्यांची उपस्थिती
या प्रभागनिहाय कॉर्नर बैठकींना नांदेडचे माजी उपमहापौर शमीम अब्दुल्ला, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव डॉ. श्रावण रॅपणवाड, तालुकाध्यक्ष राजीव पाटील रावणगावकर, राजन देशपांडे, माधवराव पाटील उन्द्रीकर, संभाजी पाटील उन्द्रीकर, शौकत पठाण, सुनिल पाटील आरगीळे, असदभाई बल्की, एस.के. बबलू, हणमंतराव श्रीमंगले, संतोषराव बनसोडे, बालाजी वाडेकर, मोहसीन बल्की, पांडुरंग आडगुलवार, शेख रौफ, शिवाजी चैनपुरे, आखीलभाई येवतीकर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रभागातील मोठ्या संख्येने मतेदार, महिला व तरुणांनी उत्साहाने उपस्थिती दाखवली.
काँग्रेस टीमचे परिश्रम
या बैठकांचे यशस्वी आयोजन करण्यासाठी शहराध्यक्ष हणमंत नारनाळीकर व काँग्रेसची संपूर्ण टीम यांनी विशेष परिश्रम घेतले.
