नेताजी खराडे  ( दौंड तालुका प्रतिनिधी )

केडगाव (ता. दौंड)  मुलगा होण्यासाठी औषधोपचार करण्याचे आमिष दाखवत एका विवाहित महिलेकडून तब्बल तीन लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार केडगाव येथील लवंगे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण दौंड तालुक्यात खळबळ उडाली असून संबंधित डॉक्टरांविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे.

पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, तिला मुलगा होण्यासाठी वैद्यकीय उपचारांची गरज असल्याचे सांगत लवंगरे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉक्टर स्वाती लवंगे यांनी संपर्क साधला. “विशेष औषधोपचार”, “नवीन तंत्रज्ञान” आणि “निश्चित यश” असे आमिष दाखवत उपचार सुरू करण्यात आले. या उपचारांसाठी टप्प्याटप्प्याने महिलेकडून सुमारे तीन लाख रुपये उकळण्यात आले.

महिलेने विश्वास ठेवून उपचार सुरू ठेवले. मात्र उपचारानंतर कोणताही ठोस वैद्यकीय निष्कर्ष किंवा अपेक्षित परिणाम न मिळाल्याने तिला संशय आला. याबाबत विचारणा केली असता डॉक्टरांकडून टाळाटाळ करण्यात आली. काही दिवसांनी सदर उपचार हे केवळ दिखावा असून कोणतीही अधिकृत वैद्यकीय प्रक्रिया किंवा नोंद नसल्याचे समोर आले.

या प्रकरणात पीडित महिलेस मानसिक व आर्थिक दोन्ही प्रकारचा मोठा त्रास सहन करावा लागला. दरम्यान, महिलेने केडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. उपलब्ध पुरावे, उपचारांच्या पावत्या, संभाषणाचे तपशील याआधारे पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

विशेष म्हणजे, या हॉस्पिटलविरोधात यापूर्वीही काही रुग्णांकडून उपचारांबाबत संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र या प्रकरणामुळे आता लवंगरे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमधील कथित बोगस औषधोपचारांचा पर्दाफाश झाला आहे.

आरोग्य विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी, संबंधित हॉस्पिटलची मान्यता, डॉक्टरांची पात्रता व उपचार पद्धतीची सखोल चौकशी करावी, अशी मागणी सामाजिक संघटना व नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान, “मुलगा होण्यासाठी” अशा अंधश्रद्धा व भावनिक कमकुवतपणाचा गैरफायदा घेत महिलांची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *