नेताजी खराडे ( दौंड तालुका प्रतिनिधी )
केडगाव : ( पुणे )कार्यालय सुरू ठेवण्याचा राज्यपालांचा आदेश असतानाही शाखाधिकारी गैरहजर शासनाच्या आदेशाचा शासकीय अधिकाऱ्यांकडूनच केला जातोय भंग केडगाव : येथील खडकवासला पाटबंधारे विभागाची शाखा सुट्टीच्या दिवशी देखील सुरू ठेवण्याचे खुद्द राज्यपालांचे आदेश असतानाही केडगावच्या शाखाधिकाऱ्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी त्याला न जुमानता कामावर अनुपस्थित राहून पराक्रम केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
केडगाव पाटबंधारे विभागाच्या शाखेचे शाखाधिकारी सिद्धार्थ शेवरे कामावर हजर राहत नाहीत याबाबत अनेकदा तक्रारी करूनही त्यांना त्याचे काही देणेघेणेच नसल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात वृत्तपत्रात, प्रसिद्धी माध्यमातून बातम्या येऊनही ‘मला काहीच फरक पडत नाही’ अशा आवीर्भावात शेवरे सध्या वावरत असल्याचे समजत आहे. अशातच आता राज्यपालांच्या आदेशालाच न जुमानून ते स्वतःला ‘हम खडा तो सरकारसे बडा’ या संवादाप्रमाणे समजत असून मनमानी कारभार करत आहेत.
त्याचे झाले असे की, महाराष्ट्र विधिमंडळाचे सन २०२५ चे हिवाळी अधिवेशन दि. ८ डिसेंबर पासून नागपूर येथे सुरू झाले आहे. शनिवार (दि. १३) व रविवार (दि. १४) या सार्वजनिक सुट्टयांच्या दिवशी अधिवेशन कामकाज सुरू राहणार आहे. त्या अनुषंगाने कामकाजाशी संबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी यांनीशनिवारी व रविवारी कार्यालयात उपस्थित राहावे असे परिपत्रक महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने काढण्यात आले होते. हे परिपत्रक सर्व शासकीय कार्यालयांना प्राप्त झालेले आहे. असे असतानाही केडगाव पाटबंधारे विभागात मात्र या आदेशाचा अवमान झाल्याचे दिसून आले.
महाराष्ट्राच्या राज्यपालांनी आदेश काढूनही केडगाव शाखेत पाहणी केली असता नेहमीप्रमाणे शाखाधिकारी सिद्धार्थ शेवरे व अन्य कर्मचारी कामावर अनुपस्थित असल्याचे आढळून आले. वरिष्ठांची मोठी कृपादृष्टी असल्यानेच त्यांचे असे धाडस होत असल्याचे वाटत आहे. अन्यथा वरिष्ठांकडे तक्रारी केल्यानंतर वरिष्ठ स्तरावर चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित असताना कोणतीच हालचाल होत नसल्याचे दिसून येत आहे.



