(नागोठणे – रोहा रायगड उपसंपादक संजय गायकवाड)

रायगड जिल्ह्यातील नागोठणे परिसरात एका तरुणाची त्याच्याच पत्नीने प्रेम प्रकरणातून ओढणीने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाने संपूर्ण रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या काही दिवसांत हे गूढ उकलले आहे.

मयत तरुणाचे नाव कृष्णा नामदेव खंडवी (वय 23, रा. गवळवाडी, पोस्ट पाबळ, ता. पेन, जि. रायगड) असे आहे. तो अचानक बेपत्ता झाल्याची तक्रार मनुष्य मिसिंग क्र. 27/2025 नागोठणे पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.

सुरुवातीला कोणताही ठोस पुरावा हाती न लागल्याने पोलिसांनी नागोठणे शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्याचबरोबर मयत कृष्णाच्या मोबाईलचा सीडीआर (कॉल डिटेल रेकॉर्ड) मिळवून त्याचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. या विश्लेषणातून काही संशयित मोबाईल नंबर समोर आले आणि त्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा बदलली.

या तांत्रिक तपासाद्वारे पोलिसांना आरोपींचा ठावठिकाणा नाशिक जिल्ह्यात लागला. त्यानंतर पोलिसांनी नाशिकमध्ये छापा टाकून मयताची पत्नी दिपाली अशोक निरगुडा (वय 19, मोहाची वाडी, पोस्ट पाबळ, ता. पेन) तसेच तिचा प्रियकर उमेश सदू महाकाळ (वय 21, बारी माळ, पोस्ट ओझरखेड, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) या दोघांना अटक केली. त्यांच्यासह आणखी एक आरोपी सुप्रिया प्रकाश चौधरी (वय 19, रा. आडगाव देवळा, पोस्ट शिरस्ता, जि. नाशिक) हिलाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

प्राथमिक चौकशीतून उघड झाले की, दिपाली आणि उमेश यांच्यात गेली दोन वर्षे प्रेमसंबंध होते. या नात्यात अडथळा ठरणाऱ्या पती कृष्णाची हत्या करण्याचा कट या दोघांनी रचला. त्यानुसार दिपालीने ओढणीने नवऱ्याचा गळा आवळून त्याचा जीव घेतला आणि नंतर त्याला बेपत्ता दाखवून गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला.

या संपूर्ण प्रकरणाचा तपास नागोठणे पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. तपासात रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल, अप्पर पोलीस अधिकारी अभिजीत शिवथरे, रोहा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रसाद गोकुळ यांचे मार्गदर्शन लाभले.

तपास पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज पाटील, पोलीस उपनिरीक्षक नरेश खेडकर, ग्रे पोलीस उपनिरीक्षक महेश लांगी, पोलीस हवालदार प्रशांत भोईर, चंद्रशेखर नागावकर, मनीषा लांगी, तसेच महिला पोलीस कॉन्स्टेबल दीपा पाटील आणि प्रकाश हंबीर आदींचा समावेश आहे.

सध्या सर्व तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. या हत्येमागील नेमका हेतू, योजना आणि इतर कोणाचा सहभाग आहे का, याबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे.

(महाराष्ट्रपोलीसन्यूज24 – शोध सत्याचा, त्याला वास्तवाची धार)

You missed