संदिप रोमण ( जेजुरी प्रतिनिधी )
पुरंदर–जेजुरी नगरीचे सुपुत्र श्री. इरफान लियाकत बागवान यांची शिवसेना पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी (अल्पसंख्यांक विभाग) निवड करण्यात आली आहे. पुरंदर–हवेलीचे आमदार श्री. विजय बापू शिवतारे यांच्या शिफारसीनुसार आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख श्री. एकनाथ शिंदे यांच्या मान्यतेने ही महत्त्वपूर्ण नियुक्ती करण्यात आली आहे.
या निवडीमुळे शिवसेनेला पश्चिम महाराष्ट्रात एक सक्षम, अभ्यासू आणि सक्रिय अल्पसंख्यांक चेहरा मिळाला असल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे. गेल्या वीस वर्षांपासून श्री. इरफान बागवान हे शिवसेनेच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील, वंचित आणि दुर्लक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने कार्यरत आहेत. पक्षनिष्ठा, जनसंपर्क आणि सामाजिक बांधिलकी यांचे उत्तम उदाहरण म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच विविध जनहिताच्या क्षेत्रांमध्ये श्री. बागवान यांनी उल्लेखनीय कामगिरी केली असून अनेक गरजू कुटुंबांना मदत, युवकांना मार्गदर्शन, शैक्षणिक उपक्रम, सामाजिक सलोखा वाढवणारे कार्यक्रम यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेतच पक्षाने त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवली असल्याचे मानले जात आहे.
नियुक्तीनंतर बोलताना श्री. इरफान बागवान यांनी शिवसेना नेतृत्वाचे आभार मानले असून, “पक्षाने माझ्यावर टाकलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडेन. शिवसेनेची विचारधारा, ध्येयधोरणे आणि लोकाभिमुख भूमिका घराघरात पोहोचवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात दौरे करून पक्षवाढीसाठी विशेष प्रयत्न करणार आहे,” असा विश्वास व्यक्त केला आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटना तसेच नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून जेजुरी आणि पुरंदर तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
