सावित्री महिला शक्ति करण फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य
(रजिस्ट्रेशन क्र. महा/११६४/२०२५, पुणे)

नेताजी खराडे ( दौंड तालुका प्रतिनिधी )


लोणीभापकर, सायंबाचीवाडी, ता. बारामती, जि. पुणे
या फाउंडेशनच्या वतीने महिलांचा उत्सव मानल्या जाणाऱ्या मकरसंक्रांती दिनाचे औचित्य साधत दि. १४ जानेवारी २०२६ रोजी ग्रामीण भागातील सायंबाचीवाडी येथील स्वयंभू मंदिर परिसरात तसेच संस्थापक अध्यक्ष राहुल भापकर यांच्या निवासस्थानी महिलांसाठी हळदी-कुंकू व वाण वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
खेळीमिळीच्या आणि आनंदी वातावरणात पार पडलेल्या या उपक्रमाला परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महिलांसाठी आयोजित हळदी-कुंकू समारंभात वाणरूपी मदत म्हणून माधुरी चव्हाण, बारामती यांनी तब्बल ७० वाण देऊन सामाजिक बांधिलकी जपली. या सहकार्याबद्दल सावित्री महिला शक्ति करण फाउंडेशनच्या वतीने माधुरी चव्हाण यांचे विशेष आभार मानण्यात आले.
या कार्यक्रमास कृषी सखी रोहिणी ताई इंगळे, बारामती तालुका खरेदी-विक्री संघाच्या सदस्य लता ताई जगताप, स्वयंभू पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ. सविता ताई घाडगे यांच्यासह विविध बचत गटातील महिला, परिसरातील प्रतिष्ठित महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सदर उपक्रमाचे संपूर्ण नियोजन हे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राहुल जगन्नाथ भापकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. कार्यक्रमात हळदी-कुंकूसाठी आलेल्या महिलांना मंगल भापकर (मातोश्री) यांच्या शुभहस्ते हळदी-कुंकवाचा करंडा व तिळगुळ देऊन वाण वाटप करण्यात आले.
ग्रामीण भागातील महिलांना एकत्र आणत, परंपरा जपत आणि सामाजिक सलोखा वृद्धिंगत करणारा हा उपक्रम स्तुत्य असल्याची भावना उपस्थित महिलांनी व्यक्त केली. महिलांचे सक्षमीकरण, एकोपा व सांस्कृतिक परंपरांचे जतन करण्यासाठी सावित्री महिला शक्ति करण फाउंडेशन सातत्याने असे उपक्रम राबवत राहणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *