चांगदेव काळेल ( सातारा जिल्हा संपादक )
सातारा शहरातील सारडा कॉलनी, शाहूपुरी येथे सुरू असलेले काम म्हणजे विकासाच्या नावाखाली चाललेली उघड फसवणूक असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे. या ठिकाणी करण्यात आलेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून, मूलभूत तांत्रिक निकष पूर्णपणे धाब्यावर बसवण्यात आले आहेत.
साईट पट्ट्या भरताना नियमानुसार आवश्यक असलेला मुरुमाचा वापर पूर्णतः टाळण्यात आला असून, थेट माती टाकून त्यावर रोलर फिरवण्यात आल्याचे प्रत्यक्ष दिसून येत आहे. हा प्रकार पाहता कामाच्या दर्जाबाबत गंभीर संशय निर्माण होत असून, ठेकेदार व संबंधित अभियंता यांच्या संगनमताशिवाय हे शक्य नसल्याची चर्चा नागरिकांत आहे.
या गंभीर बाबी कनिष्ठ अभियंता तसेच नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. मात्र, यावर कोणतीही ठोस चौकशी किंवा कारवाई न होता केवळ उडवा-उडवीची उत्तरे देण्यात आल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. वारंवार फोन कॉल करून तसेच प्रत्यक्ष भेटीचा प्रयत्न करूनही संबंधित कनिष्ठ अभियंता टाळाटाळ करत असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मुरुमाशिवाय काम कसे मंजूर झाले, मातीवर रोलर फिरवून बिलांची तयारी तर होत नाही ना, कामाचा दर्जा तपासण्याची जबाबदारी नेमकी कोणाची, आणि या प्रकरणात दोषींवर कारवाई कधी होणार—असे थेट सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.
पहिल्याच पावसात हे काम उखडून पडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी कोण घेणार, असा सवालही उपस्थित होत आहे. करदात्यांच्या पैशातून होणाऱ्या या कामाची तात्काळ स्वतंत्र चौकशी करून दोषी अभियंता व ठेकेदारावर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.


