संजय गायकवाड
पनवेल — रायगड| “स्वतःवर प्रेम करा, निरोगी शरीर हीच खरी संपत्ती आहे. सर्वांशी प्रेमाने वागा, कुणाशी दुष्मनी ठेवू नका. हा जन्म पुन्हा नाही, हे कायम लक्षात ठेवा,” असा प्रेरणादायी संदेश आंतरराष्ट्रीय कामगार नेते व रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी दिला. ते टीआयपीएल (रोटरी प्रीमियर लीग) च्या पाचव्या पर्वाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
पनवेलच्या सुंदर आणि विलोभनीय राजीव गांधी मैदानावर रोटरी प्रीमियर लिगच्या पाचव्या पर्वाचे शानदार उद्घाटन महेंद्रशेठ घरत आणि उद्योजक परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते आणि टीआयपीएलचे डायरेक्टर प्रीतम म्हात्रे, उद्योजक परेश ठाकूर, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान बोलताना महेंद्रशेठ घरत म्हणाले,
> “पनवेल नगरीत एवढे सुंदर, स्वच्छ आणि आकर्षक मैदान निर्माण झालं आहे. त्यासाठी रामशेठ ठाकूर यांचे योगदान अतुलनीय आहे. क्रिकेट हा माझ्या मनाजवळचा खेळ आहे, आजही वेळ मिळाला की मी क्रिकेट खेळतो, ट्रेकिंग करतो. कुठल्याही सत्तेत नसतानाही मी सिडकोकडून अनेक गावांना मैदाने मिळवून दिलीत. त्यामुळे सत्तेत असणाऱ्या मंडळींनी गावोगावी मैदाने निर्माण करून दिली पाहिजेत; नाहीतर सत्तेचा उपयोग काय?”
या प्रसंगी प्रीतम म्हात्रे म्हणाले, “महेंद्रशेठ घरत हे रोखठोक बोलतात, पण त्यांच्या विचारांमध्ये अनुभवाची खोली आहे. त्यांनी अनेक गावांना खेळाची मैदाने उपलब्ध करून दिलीत, हे खरोखरच अभिमानास्पद आहे.”
तर परेश ठाकूर यांनी सांगितले, “पनवेल महापालिकेच्या स्वतःच्या मैदानावर प्रथमच रोटरीच्या क्रिकेट स्पर्धा होत आहेत. मैदानाची जय्यत तयारी, व्यवस्थापन आणि खेळाडूंचा उत्साह पाहून मन आनंदित झाले आहे. हा अनुभव अविस्मरणीय ठरेल.”
रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 अंतर्गत होणाऱ्या या स्पर्धेत एकूण सहा ओनर्स, सहा संघ आणि प्रत्येकी १४ खेळाडू सहभागी झाले आहेत. स्पर्धा ७ ते ९ आणि १४ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत रंगणार आहे.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी रायगड वॉरियर्सचे अध्यक्ष गणेश कडू, सचिव डॉ. संतोष जाधव, खजिनदार आशीष थोरात, तसेच पंकज पाटील, सिकंदर पाटील, सतीश देवकर आणि देवेंद्र चौधरी यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.
खेळाडू, प्रेक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या उत्साहात टीआयपीएलचा पाचवा पर्व रंगला असून, “खेळातून आरोग्य आणि ऐक्य वाढवा” हा संदेश या स्पर्धेमधून दिला जात आहे.




