चांगदेव काळेल ( सातारा जिल्हा संपादक )
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात ३ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी विजय खैरनार याला सार्वजनिक ठिकाणी आझाद मैदानावर चौरंग करण्याची कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी तीव्र मागणी संभाजी ब्रिगेड व स्थानिक नागरिकांनी केली आहे.
या संदर्भातील निवेदन मा. तहसीलदार प्रवीण धानोरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी जत यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की
महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढत असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महिलासन्मानाच्या परंपरेला शोभेल अशी कठोर शिक्षा देण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत.
निवेदनातील प्रमुख मागण्या :
आरोपीच्या विरुद्ध विधानसभेत विशेष कायदा करून सार्वजनिक शिक्षेची तरतूद करावी
मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांत पीडित कुटुंबाची भेट घेऊन दिलासा द्यावा
प्रकरणाचा तपास उच्चस्तरीय महिला अधिकाऱ्यांकडून करावा
न्यायालयीन प्रक्रिया ९० दिवसांच्या आत पूर्ण करण्यासाठी वरिष्ठ वकील नेमावा
कार्यकर्त्यांनी चेतावणी दिली की, जर सरकारने विलंब केला तर आरोपीला जनक्षोभाचा सामना करावा लागू शकतो व त्याची सर्वस्व जबाबदारी प्रशासनाची असेल.
या निवेदनावेळी संभाजी ब्रिगेडचे सांगली जिल्हाध्यक्ष श्रेयश नाईक, पोलीस टाईम्स २४ न्यूज संपादक अजित काळेल, तसेच धनाजी चव्हाण, दिनेश देवकर, बापुसो लोखंडे, धनाजी काळेल, दिलीप देवकर, उमेश सरगर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


