राहुल पडघणे
पुसद तालुका प्रतिनिधी

१४ ऑक्टोबर २०२५ — हा दिवस प्रत्येक बौद्ध बांधवांसाठी ‘सोनेरी दिवस’ म्हणून ओळखला जातो. याच दिवशी, १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो समाज बांधवांना बौद्ध धम्माची दीक्षा देत भारतात नव्या युगाची सुरुवात केली होती. त्यानंतर दरवर्षी हा दिवस बौद्ध समाज अतिशय उत्साह, आनंद आणि अभिमानाने ‘धम्मदीक्षा दिन’ म्हणून साजरा करत असतो.

या वर्षी देखील राज्यभरात आणि देशभरात या दिवसाचे औचित्य साधून भव्य रॅल्या, धम्मप्रवचन, वंदना कार्यक्रम, व भोजनदान आयोजित करण्यात आले. भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने विविध ठिकाणी भव्य दिव्य रॅल्या काढण्यात आल्या, ज्यात युवक, महिला, वयोवृद्ध, तसेच समाजातील सर्व घटकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

या दिवशी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना पुष्पांजली वाहून, त्रिवार वंदन करून समाजबांधवांनी आपल्या श्रद्धेची अभिव्यक्ती केली.
धम्मविहारांमध्ये धम्मदीप प्रज्वलन, वंदना, सूत्रपठण, तसेच सामाजिक एकात्मता आणि समानतेचा संदेश देणारे कार्यक्रम उत्साहात पार पडले.

गावागावात, शहरात, नगरांमध्ये व प्रत्येक बुद्धविहारामध्ये या दिवशी भोजनदान आयोजित करून समाजातील बांधवांना एकत्र आणण्याचा आणि “समानतेच्या बंधुतेचा” संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या कार्यक्रमांमधून डॉ. आंबेडकरांचे “धम्म म्हणजे माणुसकीचा मार्ग” हे तत्वज्ञान पुन्हा एकदा समाजात जागृत झाले.
१४ ऑक्टोबरचा हा दिवस फक्त एक उत्सव नाही, तर बौद्ध समाजाच्या आत्मसन्मानाचा आणि परिवर्तनाच्या प्रवासाचा दिवस म्हणून साजरा केला जात आहे.

धम्म दीप जळत राहो… समाज उजळत राहो!

You missed