पेण रायगड – उपसंपादक संजय गायकवाड



पेण तालुक्यातील खारेपाट विभागात परतीच्या पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर भात शेती केली जाते, परंतु गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे संपूर्ण शेती पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.


भात काढणीच्या अगदी उंबरठ्यावर असतानाच झालेल्या या मुसळधार पावसामुळे दाण्याला कोंब फुटला आहे, पिके कुजण्याच्या मार्गावर आहेत आणि शेतकऱ्यांचे महिनोंचे कष्ट एका रात्रीत वाया गेले आहेत. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या भागाला ‘भाताचं कोठार’ म्हटलं जात असतानाच आज इथं बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.

अनेक ठिकाणी पिकं जमिनीतच रुतून बसली आहेत. धान्य वाचवण्याच्या प्रयत्नात शेतकरी स्वतः पाण्यात उतरून मजुरी मोजत आहेत. तरीदेखील बहुसंख्य पिकं नष्ट झाल्याचं दृश्य दिसत आहे.

शेतकरी वर्ग शासनाकडून तातडीने पंचनामे करून शंभर टक्के नुकसान भरपाई देण्याची मागणी करत आहे. शासनाने दुर्लक्ष न करता या भागातील प्रत्यक्ष परिस्थितीचा तातडीने आढावा घ्यावा, अशी मागणी सर्वत्र होत आहे.

खारेपाट विभागातील शेतकरी सध्या अक्षरशः हतबल झाले आहेत. अनेक ठिकाणी शेतातील भाताचं धान्य कुजल्यामुळे आर्थिक नुकसानाबरोबरच आगामी हंगामासाठीची तयारीही धोक्यात आली आहे.

“आमचं सर्वस्व पावसात वाहून गेलं… आता शासनानंच मदतीचा हात द्यावा,” असं दु:ख व्यक्त करत शेतकरी शासनाच्या दिशेने आशेने पाहत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed