(अलिबाग – रायगड उपसंपादक संजय गायकवाड)
वडखळ ते अलिबाग हा रस्ता गेल्या अनेक महिन्यांपासून खड्ड्यांनी झाकलेला होता. दररोज या रस्त्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांना आणि वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. स्थानिक पातळीवर अनेक वेळा शासन आणि प्रशासनाला या रस्त्याबाबत तक्रारी करण्यात आल्या, मात्र त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले.
शेवटी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने या प्रश्नावर आवाज उठवण्यात आला. या आंदोलनाचं नेतृत्व चित्रलेखा ताई पाटील यांनी केलं, तर ॲड. मानसी ताई पाटील यांच्यासह पक्षाचे असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतरही प्रशासनाने काहीही हालचाल न केल्याने संतापाची लाट उसळली होती.
मोर्चा आणि आंदोलन झाल्यानंतरच प्रशासनाला जणू काही जाग आल्यासारखे झाले आणि तात्काळ खड्डे भरण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र हे काम सध्या केवळ काही ठिकाणी थातूरमातूर स्वरूपात सुरू असून अनेक भागांमध्ये अजूनही मोठे खड्डे तस्सेच आहेत. कारलेखिंडी परिसरात तर रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट असून, वडखळ-अलिबाग मार्गावर अजूनही प्रवास धोकादायक ठरत आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या या संथ कारभारावर नाराजी व्यक्त केली असून “प्रशासनाला प्रत्येक वेळी आंदोलन झाल्यानंतरच जाग का येते?” असा सवाल उपस्थित केला आहे. जनतेच्या जीवाशी खेळ करूनच विकासाची कामे सुरू ठेवायची का, असा प्रश्नही नागरिक विचारत आहेत.
चित्रलेखाताई पाटील यांनी प्रशासनास इशारा दिला आहे की — “जोपर्यंत संपूर्ण रस्ता दुरुस्त होत नाही, तोपर्यंत आंदोलनाची लढाई सुरू राहील.”
प्रशासनाने तातडीने संपूर्ण रस्ता दर्जेदार पद्धतीने दुरुस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा, हीच सर्वांची मागणी आहे
