पंकज सरोदे

पाथरी (जि. परभणी) – प्रतिनिधी

फेसबुक या सोशल मीडियावर “श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर” यांच्या विषयी अर्वाच्च, अपमानास्पद व भडकाऊ भाषेत पोस्ट व कमेंट करून सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या प्रताप आमले, शिवम सरपोतदार, आण्णासाहेब जगदाळे आणि भाऊ जगदाळे या व्यक्तींविरुद्ध आज पाथरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी वंचित बहुजन आघाडी तसेच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने पाथरी येथे एकत्र येत पोलिस निरीक्षक, पाथरी पोलिस स्टेशन आणि तहसील कार्यालय, पाथरी यांना निवेदन सादर केले. या निवेदनाद्वारे संबंधित व्यक्तींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की —

“श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे देशातील वंचित, शोषित, पीडित समाजाचे नेते असून त्यांच्या विरोधात अशा अश्लील व द्वेषपूर्ण भाषेतील पोस्ट करून काही समाजकंटक सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रवृत्तीवर तातडीने अंकुश ठेवणे अत्यावश्यक आहे.”

निवेदनानंतर पाथरी पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली असून, संबंधित आरोपींवर सामाजिक सौहार्द बिघडविण्याच्या हेतूने केलेल्या कृत्यांबद्दल आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

या वेळी वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक पदाधिकारी, युवक कार्यकर्ते आणि अनेक आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलन शांततेत पार पडले, मात्र उपस्थितांनी ठाम इशारा दिला की —

“जर आरोपींवर तत्काळ कारवाई झाली नाही, तर पुढील आंदोलन अधिक तीव्र केले जाईल.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed