शुभांगी वाघमारे
सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या पैलवान किरण साकोरे यांनी हजारो भाविकांना काशी विश्वनाथ व अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी घेऊन जाण्याचे अद्वितीय कार्य केले आहे. सेवाभावी वृत्ती असलेल्या साकोरे यांना जनतेचा उदंड आशीर्वाद लाभेल आणि त्यांची राजकीय स्वप्ने पूर्ण होतील, असा विश्वास पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, पिडीसीसी बँकेचे संचालक व भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदिप विद्याधर कंद यांनी यात्रेच्या प्रस्थानप्रसंगी व्यक्त केला.
‘प्रदिपदादा कंद युवा मंच’ व ‘पैलवान किरण साकोरे मित्र परिवार’ यांच्या वतीने आयोजित काशी विश्वनाथ–अयोध्या मोफत देवदर्शन यात्रेची पहिली रेल्वे ५ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता पुणे–हडपसर स्थानकावरून जय श्रीराम, हर हर महादेवच्या घोषणात रवाना झाली. प्रदिप विद्याधर कंद यांच्या हस्ते पूजन करून हिरवा झेंडा दाखवत यात्रेचे शुभारंभ करण्यात आले.
यावेळी लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार पैलवान किरण साकोरे, रविंद्र कंद, संजीवनी कापरे, मंदाकिनी साकोरे तसेच गटातील आजी-माजी सरपंच, उपसरपंच, संचालक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ही यात्रा आमदार ज्ञानेश्वर कटके, जिल्हाध्यक्ष प्रदिप विद्याधर कंद, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष तथा भाजप क्रीडा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष पैलवान संदिप भोंडवे, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सुभाष जगताप, हवेली तालुका पंचायत समितीचे उपसभापती ज्ञानेश्वर वाळके, पुणे, हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती तथा संचालक रविंद्र कंद, जिल्हा परिषदेचे सदस्य शंकर भुमकर, हवेली पंचायत समितीच्या उपसभापती संजीवनी कापरे आदींच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली. यात्रेच्या यशस्वी नियोजनात प्रत्येक गावातील भाविकांसाठी बससेवा, रेल्वे स्थानकावर अल्पोपहार, वैद्यकीय पथक व स्वयंसेवकांची उत्कृष्ट व्यवस्था यावेळी करण्यात आली.
हडपसर रेल्वे स्थानक जयघोषात दुमदुमले! तुतारी, हलगी, ताशा–ढोलाच्या गजरात आणि जय श्रीराम! हर हर महादेव! च्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. वारकरी भजनी मंडळाच्या भक्तिगीतांनी वातावरण अधिक मंगलमय झाले.
“जनतेच्या आशीर्वादाने माझे स्वप्न साकार झाले असून, काशी विश्वेश्वर व प्रभू श्रीरामांच्या आशीर्वादाने विकासाची गंगा लोणीकंद–पेरणे गटात आणणार,” असे आश्वासन पैलवान किरण साकोरे यांनी यात्रेकरूंना दिले.
ही यात्रा केवळ लोणीकंद–पेरणेपुरती मर्यादित न राहता संपूर्ण हवेली तालुक्यात श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक एकतेचा प्रेरणादायी संदेश पोहोचवणारी ठरली आहे.



