स्मिता बाबरे ( मुख्य संपादिका )

धनश्री हॉटेल अॅण्ड लॉजमध्ये सुरू असलेल्या देहविक्रीच्या धंद्याने संत परंपरेच्या गावाचे नाव कलंकित ; पोलिसांकडून डोळेझाक? नागरिकांत तीव्र संताप…
पुणे (दौंड) : वारकरी संप्रदायाची परंपरा, संत तुकाराम महाराज पालखीचा मुक्काम आणि प्रगतशील शेतकऱ्यांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेले यवत हे पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे गाव. पण, या गावाच्या नावावर आता एक काळा डाग बसल्याची चर्चा सुरू आहे. परिसरात खुलेआम देहविक्रीचा अवैध व्यवसाय सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले असून, पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.
यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुणे-सोलापूर महामार्गालगत असलेल्या CNG पंपाजवळील “धनश्री हॉटेल अॅण्ड लॉज” या ठिकाणी काही काळापासून देहविक्रीचा धंदा जोमात सुरू असल्याचे नागरिकांनी उघड केले आहे. अनेकांनी या संदर्भात 112 हेल्पलाईनवर तसेच यवत पोलीस ठाण्यात वारंवार तक्रारी केल्या असल्या तरी, पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या संदर्भात ‘महाराष्ट्र पोलीस न्यूज’च्या हाती मिळालेल्या व्हिडिओ पुराव्यांमध्ये, लॉजमध्ये चालणारा गैरकृत्याचा पुरावा स्पष्टपणे दिसत असल्याचे सूत्रांनी सांगितले. हे व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होण्याची शक्यता आहे.
स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, पोलिसांनी या गैरकृत्याविषयी “हाताची घडी, तोंडावर बोट” अशी भूमिका घेतली असून, स्थानिक पोलीस ठाण्यातूनच या अवैध व्यवसायाला मूक परवानगी मिळाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिस प्रशासनाच्या या भूमिकेमुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे.
संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम असलेल्या गावात अशा घृणास्पद कृत्यांना स्थानिक पोलिसांकडूनच संरक्षण मिळते का? असा प्रश्न आता सर्वत्र उपस्थित केला जात आहे. ग्रामीण भागात पोलिसांची गस्त आणि तपास व्यवस्था यवतसारख्या गावातही इतकी निष्क्रीय का झाली आहे, असा सवाल नागरिकांतून होत आहे.
या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. (कृष्णप्रकाश गिल) यांनी स्वतःहून लक्ष घालून धनश्री हॉटेल अॅण्ड लॉजवर छापा मारून संबंधित हॉटेल चालक, व्यवस्थापक व पोलिस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
“ज्यांच्या संरक्षणाखाली असा गैरप्रकार सुरू आहे, त्यांच्यावर विभागीय चौकशी होणे आवश्यक आहे,” असे नागरिकांचे मत आहे.
संत तुकारामांच्या नामगजराने दुमदुमणाऱ्या यवत गावात अशा अमानवी, बेकायदेशीर व्यवसायांना स्थान मिळणे हे वारकरी परंपरेचा अपमान असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. पोलिस प्रशासनाने तातडीने पावले न उचलल्यास नागरिकांकडून मोर्चा, ठिय्या आंदोलन व सोशल मीडियावर जनआंदोलन उभे करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
