इम्रान तांबोळी ( पंढरपूर प्रतिनिधी )

पंढरपूर — पंढरपूर शहरात गेली पंचवीस वर्षे एकच जुनी कहानी सुरू आहे विकासाच्या मोठमोठ्या आश्वासनांनी शहराची दिशाभूल, पण प्रत्यक्षात काहीच काम नाही. रस्ते तेच, गटारे तेच, सुविधा तोकड्या आणि समस्या मात्र दिवसेंदिवस वाढत्या. या पंचवीस वर्षांच्या काळात जनता मात्र आता जागी झाली आहे. कोण कसा “गेम” करतो आणि निवडणुकीच्या वेळी कशी नाटकं केली जातात, हे जनतेला चांगलेच कळून चुकले आहे.

नगरपरिषद निवडणूक आली की सर्वच नगरसेवक आपल्या-आपल्या वार्डात पोहोचतात. गल्लीबोळात जाऊन लोकांच्या समस्या ऐकल्या जातात, त्यांच्या घरच्या दारात उभं राहून आपणच खरे सेवक असल्याचं सांगितलं जातं. पण निवडणूक संपली की हेच नगरसेवक मिस्टर इंडिया होतात. विकासाच्या नावाने फक्त निवडणुकीपूर्वीचे फोटोशूट आणि खोटी आश्वासने  एवढाच जनतेच्या वाट्याला आलेला विकास.

शहरात कुठेही पाहिलं तरी गेल्या वर्षांच्या तुलनेत कोणताही पायाभूत बदल दिसत नाही. प्रश्न तेच, अडचणी त्या… आणि आश्वासने मात्र नवीन!

आता मात्र जनता ठाम आहे यावेळी कोणाचा गेम, कसा होणार, हे फक्त जनता ठरवणार.

या निवडणुकीत पंढरपूर नव्या विचारांना तयार आहे. जुन्या चेहऱ्यांनी दिलेली फसवणूक जनता विसरलेली नाही. त्यामुळे यावेळी नवीन चेहऱ्यांना संधी नव्हे, तर एक मोठा मोका मिळू शकतो, कारण जनता आता बदल शोधत आहे.

ही निवडणूक फक्त नगरसेवकांची नाही, तर पंढरपूरच्या भविष्यासाठीचा निर्णायक क्षण ठरणार आहे. जनतेचा हा जागरूकपणा आणि बदलाची मागणी पंढरपूरची दिशा बदलू शकते, अशी मोठी अपेक्षा आता नागरिकांमध्ये आहे.

प्रतिनिधी
इम्रान तांबोळी
8788983361

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed