गुलाब शेख (  उपसंपादक )

मुखेड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पारदर्शक आणि शांततेत पार पडण्यासाठी निवडणूक प्रशासनाने व्यापक तयारी केली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार शहरातील विविध विभागांत तपासणी, देखरेख आणि आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. 17 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरळीत पार पडली.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, विविध कार्यालयीन आणि क्षेत्रीय पाहणीसाठी अधिकारी नियुक्त करून संपूर्ण शहरात कडक निरीक्षण ठेवले जात आहे. कोणत्याही प्रकारची गैरप्रकार, अनधिकृत प्रचार साहित्याचा वापर, वाहतूक नियमांचे उल्लंघन किंवा मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न तात्काळ रोखण्यासाठी विशेष लक्ष दिले जात आहे.

शहरात तयार करण्यात आलेल्या टीममध्ये तहसीलदार, नायब तहसीलदार, नोडल अधिकारी, पोलीस विभाग, विशेष उडन पथक, व्हिडिओ सर्व्हेलन्स टीम, एक्स्पेंडिचर मॉनिटरिंग टीम आणि वाहन तपासणी पथक यांचा समावेश असून प्रत्येक पथकासाठी स्वतंत्र जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर आणि चौरस्त्यांवर सतत गस्त व तपासणी सुरू आहे.

याशिवाय संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची उपस्थिती वाढवण्यात आली असून मतदान प्रक्रियेपूर्वी मतदार नोंदी, मतदान केंद्रांची तयारी आणि सर्व सुरक्षा उपायांची तपासणी प्रशासनाकडून केली जात आहे.

मुखेडमध्ये निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई केली जाणार असल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed