नेताजी खराडे ( दौंड तालुका प्रतिनिधी )
पाटस : ( दौंड ) येथील ऐतिहासिक गावतलावावरील अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा जोरदार पेटला असून, मागील काही दिवसांत छापून आलेल्या समाचारांनंतर गावात मोठी चर्चा रंगली आहे. तलावाच्या हद्दीतील बेकायदा अतिक्रमणांवर कारवाई व्हावी, यासाठी सर्वसामान्य नागरिकांचा ‘छुपा पाठिंबा’ उघड होत असून अतिक्रमणकर्त्यांचे धाबे दणाणले आहेत.

गावात आणि २८ वाड्यावस्त्यांत नागरिकांमध्ये एक प्रकारचा असंतोष निर्माण झाला असून “गावाचा जीव असलेल्या तलावावर मुठभर लोकांची गंडांतरवाडी चालू कशी काय?” असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. अनेक नागरिक, शेतकरी आणि युवकांनी प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी, अशा सूचक पद्धतीने पाठिंबा दर्शवायला सुरुवात केली आहे.
दरम्यान, अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या बातमीनंतर तलाव परिसरातील काही अतिक्रमण धारकांची हालचाल चक्रावली असून, कारवाईची भीती निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. हद्दीची जमीन बळकावणे, भराव नष्ट करून व्यवसाय थाटने, बोगस कागदपत्रे तयार करून तलाव जमीन दाखवून तिची विक्री व्यवहार करणे, असे प्रकार सुरू आहे. पाटस–कुसेगाव रोडवरील तलाव क्षेत्रात व्यापारी जागांची उभारणी यासारख्या प्रकरणांबद्दल ग्रामस्थ आता उघडपणे नाराजी व्यक्त करू लागले आहेत.

तलाव परिसरातील दूषित सांडपाण्यामुळे तलावाची स्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. पाणीसाठा कमी होण्याचा आणि भविष्यात तलाव फुटण्याचा धोका असल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे सावट आहे. “आज तलाव वाचवला नाही तर उद्या आमची तहान भागवणार कोण?” असा मूलभूत प्रश्नही ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.
या पार्श्वभूमीवर काही शेतकरी व नागरिकांनी तलावातील अतिक्रमण हटवण्याची लेखी मागणी तहसीलदारांकडे केली आहे. या मागणीची चर्चा गावोगाव पोहोचताच, दडपून राहिलेला लोकसमर्थनाचा आवाज छुपा पाठिंब्याने अधिक तीव्र झाला आहे.
गावकऱ्यांमध्ये प्रशासनाविषयी विश्वास वाढत असून, अनेक नागरिक पुढे येऊन मदत करण्यास तयार असल्याचे दिसत आहे. पाटस गावतलावाचा मुद्दा आता विकास, पर्यावरण आणि जलसाठा सुरक्षेचा बनला असून, येत्या काही दिवसांत मोठी कार्यवाही होण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत.

