नेताजी खराडे ( दौंड तालुका प्रतिनिधी )
पाटस गाव तलावात अतिक्रमण केले त्याच्याच पोटात दुखते का? अतिक्रमण केलेच नाही तर घाबरताय का?
पाटस : पाटस गाव तलावावरील अतिक्रमण प्रकरणाला नव्या वळणावर नेत काही जण कागदपत्रांच्या सुरळ्या हातात घेऊन येत आहेत आणि “ही जागा आमचीच” असा दावा पत्रकारांच्या कार्यालयात मांडू लागले आहेत. कार्यालयात गरीबांवर अन्याय होत असल्याची विनवणी करणारे हेच लोक गावात मात्र दादागिरीच्या सुरात वावरण्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. तलाव परिसरातील वादग्रस्त ‘जहागिरी’ प्रकरणामुळे या कागदपत्रांचा खेळ अनेक वृत्तपत्रांच्या दारापर्यंत पोहोचला आहे.
संपादकांसमोर अन्याय होत असल्याचे ढोंग केले जात असले तरी तालुक्यात हेच लोक लोकप्रतिनिधींचे फलक लावून रुबाब दाखवत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अतिक्रमणाचे खरे स्वरूप झाकण्यासाठीच हा सारा गोंधळ उभा करण्यात येत असल्याची गावातील चर्चेला जोर आहे.
याठिकाणी प्रशासनाकडून लवकरच मोजणी होणार असल्याने दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार आहे, याची स्पष्ट जाणीव संबंधितांना आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांपर्यंत कुणी पोहोचू नये म्हणून विविध राजकीय व सामाजिक मार्गांनी दबाव टाकण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचे दिसत आहे. काही अतिक्रमणधारकांनी तर सरकारी जमीनच विकून टाकल्याने गुन्हे दाखल होण्याच्या भीतीने धडपड सुरू असल्याची माहितीही नागरिक देत आहेत.
दरम्यान, या सर्व प्रकरणात पाटस कारखाना रोडवरील एका हॉटेलमालकाचा हस्तक्षेप वाढल्याची चर्चा आहे. जागा बळकावण्यासाठी तो अतिक्रमणधारकांना पाठबळ देत असल्याचे आरोप होत आहेत. त्याचबरोबर एका गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तीने आपले हॉटेल स्थापन करून “मी आहे ना, काळजी करू नका” अशा आश्वासनांतून लोकांची दिशाभूल सुरू केल्याचेही स्पष्ट झाले आहे. प्रशासन कारवाई सुरू केल्यानंतर या सर्वांचा कावा उघडकीस येणारच, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.
गावात सध्या एकच चर्चा आहे
जागा आमचीच असा दावा करणारे काही जण वेळ, परिस्थिति आणि स्थळानुसार आपले रूप बदलताना दिसत आहेत. ही मंडळी नागरिकांसाठी केवळ ‘टाइमपास’ विषय ठरत असल्याचे लोक उपरोधिकपणे बोलू लागले आहेत.
पाटस गाव तलाव बचाव समिती नुकतीच नव्याने पुढे आली आहे छुप्या पद्धतीने या प्रकरणात ते पुढाकार घेत शांततेतपणे काम सुरू केले आहे. शासकीय कामकाजासाठी आवश्यक खर्चाची जमवाजमव या समितीमार्फत केली जात असून अतिक्रमण करणाऱ्यांना कायदेशीर धडा शिकवण्याची नागरिकांनी जणू प्रतिज्ञाच केली आहे. त्यामुळे तलावाची जागा विकणे, ताबा घेणे आणि त्याचसाठी दबाव व धमक्या देणे यांसारखे प्रकार लवकरच थांबणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
अतिक्रमित जागा विकणे हा गंभीर कायदेशीर गुन्हा ठरतो. तरीही काही जण नागरिकांना “आमच्या वाटेला जाऊ नका” अशा धमक्या देत असल्याचेही समोर आले आहे. या सर्व हालचालींचा उद्देश एकच अतिक्रमणाचा मागोवा लपवणे असल्याचे पाटसकरांना आता पूर्णपणे स्पष्ट झाले आहे.

