नेताजी खराडे ( दौंड )
पाटस गावात अतिक्रमण फोफावण्याची शक्यता?
पाटस : येथील गाव तलावाची १३२ एकरची नोंद असताना या तलाव हद्दीत सुरू असलेल्या अतिक्रमण प्रकरणाला नवे वळण मिळत असून काही व्यक्तींनी अचानक विविध कागदपत्रांचा गठ्ठा तयार करून “ही जागा आमचीच” असा दावा पुढे सरकवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या अनपेक्षित हालचालींमुळे नागरिकांमध्ये संभ्रम व संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
संबंधित व्यक्ती ज्या दिवशी बातमी आली की त्या पत्रकारांच्या कार्यालयात जाऊन आपल्यावर अन्याय होत असल्याचे सांगत असले तरी गावात त्यांच्या वर्तनाची भलतीच झलक दिसत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. शांतपणे विनवणी करणारे हेच लोक तलाव परिसरात मात्र उंची आवाजात दादागिरी करताना दिसत असल्याने त्यांच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या संपूर्ण प्रक्रियेचा उद्देश तलावावरील अतिक्रमणाचे खरे स्वरूप झाकणेच असल्याचे संकेत मिळत आहेत.
मात्र पाटस गाव तलाव हद्दीतील तलावाच्या शासकीय मालमत्ता असलेल्या जमिनीचा व्यवहार एका गुंठ्याला ३० लाख रुपये अधिक रक्कमेचा होत असल्याची चर्चा पाटस गावात होत आहे. यामुळे तलाव मोजणी झाली की अनेक बोगस व्यवहार झाल्याचे पुढे येणार आहे यात शंका नाही. १३२ एकर असलेला तलाव दौंड तहसीलदार, महसूलविभाग, पाटबंधारे विभाग यांच्याकडून दुर्लक्षित झाल्यामुळे अनेकांचे उद्योग फोफावले गेले मात्र तलाव बचाव समितीला कळून चुकले आहे की, भविष्यात या तलावाचा गावाला किती फायदा आहे यामुळे ते तलाव कागदपत्रे, सरकारी, तलाव नोंदी, महसूलचे नकाशे अशी कागदपत्रांची सरकारी अधिकाऱ्यांकडून तपासणी करून कायदेशीर मार्गाने काम करत आहेत.
दरम्यान, पाटस गाव तलावाची बोगस कागदपत्रे तयार करून सरकारला कोणी फसविले? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाचा, कायद्याचा दुरुपयोग कोणी केला? तो कोणाच्या सांगण्यावरून केला? खरंच सरकारी अधिकाऱ्यांनी तलाव नकाशे तयार केले का? की बोगस नकाशे तयार करून त्यावर बोगस सरकारी शिक्के तयार करून मारले गेले आणि हा कागद खरा आहे हे दाखवण्यात आले? ह्या गोष्टी सरकारी महसूल कार्यालयात उपलब्ध नाहीत हे तलाव बचाव समितीला माहित आहे मात्र त्याचा भांडाफोड या तलावाची सरकारी मोजणी झाल्यावरच समोर येईल यात शंका नाही.
प्रशासनाकडून तलाव जागेची मोजणी लवकरच होणार असल्याने अनेकांची घाईगडबड वाढली आहे. मोजणीदरम्यान सत्य स्पष्ट होणार असल्याने काही व्यक्तींनी ‘कागदपत्रांचा खेळ’ सुरू केल्याची चर्चा गावभर पसरली आहे. तलाव परिसरातील या वादाला बाह्य हस्तक्षेपही मिळत असल्याची माहिती समोर आली आहे. पाटस कारखाना रस्त्यावरील एका हॉटेलमालकाने अतिक्रमण करणाऱ्यांना उघडपणे पाठिंबा दिल्याचे सांगितले जाते तर आणखी एकजण “मी पाहतो, तुम्ही काळजी करू नका” असा भाव निर्माण करत दिशाभूल करत असल्याची नागरिकांत चर्चा आहे.
दरम्यान, तलाव बचाव समितीने या घटनाक्रमाची गंभीर दखल घेतली आहे. समितीच्या वतीने शासकीय प्रक्रियेचे पालन व्हावे, तसेच तलावाची जमीन वाचवण्यासाठी कायदेशीर पातळीवर आवश्यक तयारी सुरू करण्यात आली आहे. नागरिकांचा सहभागही वाढत असून तलाव वाचवण्याचा निर्धार गाव पातळीवर दृढ होताना दिसतो. अतिक्रमित सरकारी जमीन विकणे हा कायद्यानुसार दंडनीय गुन्हा आहे. तरीही अशा कामांना संरक्षण देण्यासाठी काहीजण धडपड करत असल्याचे आरोप सतत पुढे येत आहेत. “आपल्या कागदपत्रांत सत्य असते तर एवढी धडपड करण्याची गरजच नव्हती,” असा सरळ सवाल अनेक नागरिकांनी उपस्थित केला आहे.
या सर्व घडामोडींमुळे पाटस गावात तलावावरील अतिक्रमणाचा मुद्दा अधिकच तापला असून प्रशासन कारवाईनंतर सत्य उजेडात येईल, अशी सर्व सामान्यांची अपेक्षा आहे त्यातही प्रशासनाकडून नि:पक्षपणे कारवाई होईल का? अशी शंकाही वाटत आहे.

