शुभांगी वाघमारे
पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांतील शेकडो कर्मचाऱ्यांच्या वेतन कपात आणि आस्थापना बदलाच्या निर्णयाविरोधात आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने मनपा आयुक्त नवल किशोर राम यांना निवेदन देण्यात आले. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल रामचंद्र शेवाळे यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधी मंडळाने ही भेट घेतली.
२०२१ मध्ये २३ गावांचा पुणे महानगरपालिकेत समावेश झाल्यानंतर स्थापनेची तपासणी करण्यासाठी नियुक्त समितीने “सूडबुद्धीने अहवाल तयार केल्याचा” आरोप शेवाळे यांनी यावेळी केला. या अहवालाच्या आधारे अनेक कर्मचाऱ्यांचे पदनाम बदलण्यात आले असून वेतनात मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली आहे, असेही त्यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले.
कर्मचार्यांची आर्थिक कुचंबणा
अचानक झालेल्या वेतन कपातीमुळे अनेकांना
▪️ घरकर्ज
▪️ शिक्षण
▪️ लग्न
▪️ उपचारासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरणे कठीण झाले आहे.
यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून अनेक गावांमधून तक्रारी सातत्याने येत असल्याचे शेवाळे यांनी सांगितले.
लेखी मागणी
शेवाळे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनामध्ये पुढील मागण्या करण्यात आल्या —
वेतन कपात त्वरित रद्द करावी
आस्थापना पुनर्रचना थांबवावी
चुकीचा अहवाल मागे घ्यावा
आयुक्तांचे आश्वासन
यावर प्रतिक्रिया देताना मनपा आयुक्त नवल किशोर राम यांनी संबंधित समितीच्या अहवालाची पुनर्चौकशी केली जाईल आणि कर्मचारी वर्गाला न्याय दिला जाईल, असे स्पष्ट आश्वासन दिले.
या बैठकीस मनपा उपायुक्त प्रसाद काटकर तसेच २३ गावांतील अनेक कर्मचारी उपस्थित होते.
या निर्णयावर पुढील काही दिवसांत काय पाऊल उचलले जाते, याकडे पुणे मनपातील कर्मचाऱ्यांचे आणि संबंधित गावांचे लक्ष लागले आहे.



