वैभव पांचगणे
कात्रज | पुणे
कात्रज जांभूळवाडी रोडवरील हनुमान नगर सर्वे नं. ३६ मधील एका घरात मंगळवारी संध्याकाळी अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने भीषण आग लागली. एका गुंठ्याच्या दोन मजली घराच्या तळमजल्यावर लागलेल्या या आगीत घरातील वायरिंग, इलेक्ट्रॉनिक साहित्य, फर्निचर, कपडे, भांडी व इतर वस्तू जळून पूर्णपणे खाक झाल्या. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घरमालक हर्षद मारुती धनावले यांनीच तत्परतेने अग्निशमन दलाला माहिती दिल्यानंतर घटनास्थळी अग्निशमन विभागाचे पथक दाखल झाले. मात्र मुख्य रस्त्यापासून सुमारे 100 मीटर अरुंद गल्लीत आग लागल्याने दलाला घटनास्थळी पोहोचण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागला.
सदर परिस्थिती पाहता दलाच्या जवानांनी 5 होज पाईपलाईन टाकून पाण्याचा मारा करत आग नियंत्रणात आणण्याचे काम हाती घेतले. घरातून मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याने बीए सेटचा वापर करून जवानांनी आत प्रवेश केला व गॅस सिलेंडर बंद करून संभाव्य मोठा स्फोटाचा धोका टाळला.
आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
अग्निशमन दलाच्या या कामगिरीत
गणेश भंडारे
योगेश कुंभार
तेजस मांडवकर
अक्षय देवकर
या जवानांनी विशेष परिश्रम घेत आग पूर्णपणे विझवण्यात यश मिळवले.
स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाच्या तत्परतेचे कौतुक केले असून वेळेवर मदत मिळाल्याने मोठी दुर्घटना टळल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
(वैभव पाचांगणे| महाराष्ट्र पोलीस न्यूज 24)
— शोध सत्याचा… त्याला वास्तवाची धार


