हारून शेख ( महाराष्ट्र प्रतिनिधी )
बीड येथील लोकजगत या वृत्तपत्राच्या संपादिका तथा सामाजिक कार्यकर्त्या पत्रकार शेख आयेशा यांच्या सामाजिक व पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याचा गौरव करत त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील मुख्यमंत्री निवासस्थान ‘वर्षा’ येथे सन्मान सोहळा पार पडला.
हा सन्मान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी, सुप्रसिद्ध गायिका, अभिनेत्री, बँकर व सामाजिक कार्यकर्त्या सौ. अमृता देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.
अल्पावधीत पत्रकारिता क्षेत्रात भरीव कामगिरी करत अल्पसंख्याक समाजातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी शेख आयेशा यांनी सुरू केलेली चळवळ प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार सौ. अमृता फडणवीस यांनी यावेळी काढले. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना त्या म्हणाल्या,
“तृतीयपंथीयांच्या सक्षमीकरणासाठी तसेच अल्पसंख्याक समाजातील अन्यायग्रस्त महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी शेख आयेशा यांनी सुरू केलेला लढा नक्कीच कौतुकास्पद आहे. ग्रामीण भागातून येऊन त्यांनी निर्माण केलेला विश्वास प्रेरणादायी आहे.”
मुंबईतील मुख्यमंत्री निवासस्थान ‘वर्षा’ येथे हा वाढदिवस अत्यंत आपुलकीच्या व उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी शेख आयेशा यांचा पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. केक कापून तोंड गोड करत आनंदी वातावरणात हा सोहळा पार पडला.
पुढे बोलताना सौ. अमृता फडणवीस यांनी सांगितले की,
“दिव्याज फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांच्या ‘आश्रय सेवाभावी संस्था’सोबत तृतीयपंथीय व महिलांच्या प्रश्नांवर संयुक्तपणे काम करण्यासाठी आम्ही सहकार्य करू.”
या घोषणेमुळे सामाजिक क्षेत्रात सकारात्मक बदल घडविण्यासाठी नवे दालन खुले झाले आहे.
या प्रसंगी कोणतेही नातेवाईक संबंध नसतानाही ग्रामीण भागातील पत्रकार महिलेला मैत्रिणीच्या नात्याने आमंत्रित करून केलेले आदरातिथ्य उपस्थित पाहुण्यांचे लक्ष वेधून घेणारे ठरले. संपूर्ण पाहुणचार अत्यंत सन्मानपूर्वक, आपुलकीचा व अविस्मरणीय होता.
आपल्या भावना व्यक्त करताना शेख आयेशा म्हणाल्या,
“मी एका सामान्य कुटुंबातील, अल्पसंख्याक समाजातील महिला असूनही थेट मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी माझा वाढदिवस साजरा होणे, हा माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण आहे.”
हे सांगताना त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटून आले.
पत्रकारिता, सामाजिक बांधिलकी आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या शेख आयेशा यांच्या कार्याचा झालेला हा गौरव अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत असून, ग्रामीण भागातील पत्रकार महिलांसाठी नवी उमेद निर्माण करणारा आहे.
