नेताजी खराडे ( दौंड तालुका प्रतिनिधी )
केडगाव : येथील खडकवासला पाटबंधारे शाखेच्या कार्यालयातील शाखाधिकारी सिद्धार्थ शेवरे हे सहा/सहा महिने शाखेत येत नसल्याने येथे सावळा गोंधळ सुरू असून शाखा परिसरात अनेक अवैध धान्यांनी व अतिक्रमणांनी डोके वर काढले आहे. कदाचित या सर्व प्रकारांना देवरे यांचाच पाठिंबा नाही ना? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
दौंड तालुक्यातील केडगाव येथे असलेल्या खडकवासला पाटबंधारे शाखेच्या कार्यालयात शाखाधिकारी सिद्धार्थ शेवरे हे कामावरच येत नसल्याने शाखेच्या परिसरात अतिक्रमणे वाढत चालले असून अवैध्य धंद्यांना सुद्धा मोकाट रान सापडले आहे. शाखेच्या परिसरातील झाडे दिवसाढवळ्या तोडली जात असून यामध्ये नैसर्गिकरीत्या आलेली काही मौल्यवान झाडेही चोरीस जात आहेत. कालव्याच्या दुतर्फा अतिक्रमणे वाढत असून काही ठिकाणी कालवा देखील बुजवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पत्त्यांचे डाव मटका जुगार हे तर नेहमीचेच झाले असून अशा काळे धंदे करणाऱ्यांची मुजोरी वाढली आहे. याचा नाहक त्रास येथे राहणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना होत असून महिलांना सुद्धा परिसरात फिरणे अवघड झाले आहे.
या संदर्भात काही स्थानिक वृत्तपत्रातून बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या तसेच सिद्धार्थ शेवरे यांना देखील तक्रारी दिल्या होत्या मात्र स्वतः शेवरेच जागेवर नसल्याने हे प्रश्न गुलदस्त्यातच राहिले आहेत. अनेकदा तक्रारी करूनही व शाखेतील समस्या मांडूनही सिद्धार्थ शेवरे हे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत की काय असे वाटू लागले आहे. यामुळे सदर अवैद्य धंद्यांना व अतिक्रमणांना शेवरे यांचा ‘अर्थपूर्ण’ पाठिंबा तर नाही ना ?अशी शंकाही उपस्थित होत आहे.
काळे धंदे करणाऱ्यांचा त्रास शाखा परिसरात तरुण-तरुणींचे होणारे अश्लील चाळे तसेच अतिक्रमणधारकांची दादागिरी या सर्वांमुळे येथील स्थानिक रहिवासी असलेले शासकीय कर्मचारी यांचे काही बरे वाईट झाल्यास त्याला सिद्धार्थ शेवरे हेच जबाबदार असतील असेही नागरिकांमधून बोलले जात आहे.
