शुभांगी वाघमारे
२२ वर्षांनंतरची माफी म्हणजे गुन्ह्याची कबुली – संभाजी ब्रिगेडचा ठाम आरोप..
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी करणाऱ्या अमेरिकन लेखक जेम्स लेनच्या घृणास्पद व देशद्रोही लिखाणाला आज २२ वर्षे पूर्ण झाली असून, या प्रकरणात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने अलीकडे मागितलेली माफी ही माफी नसून गुन्ह्याची उघड कबुली आहे, असा घणाघाती आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. माफीनाम्याच्या आधारे कोणत्याही आरोपीची सुटका होऊ दिली जाणार नाही, असा थेट इशाराही संघटनेने दिला आहे.
संभाजी ब्रिगेडच्या म्हणण्यानुसार, सन २००३ मध्ये छत्रपती उदयनराजे भोसले महाराजांनी जेम्स लेनच्या लिखाणाविरोधात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला पत्र पाठवले होते. मात्र तब्बल दोन दशके या पत्राकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. आता, न्यायालयीन कारवाईचा धोका निर्माण झाल्यानंतर अचानक माफी मागणे ही नैतिकतेतून किंवा इतिहासप्रेमातून आलेली कृती नसून, केवळ कायदेशीर अडचणीतून सुटका मिळवण्यासाठी रचलेला डाव आहे, असा आरोप करण्यात आला आहे.
५ जानेवारी २००४ : स्वाभिमानाचा इतिहास
संभाजी ब्रिगेडने ५ जानेवारी २००४ रोजी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवर केलेली कारवाई ही हल्ला नसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी उभा राहिलेला स्वाभिमानाचा स्फोट होता, असे ब्रिगेडने स्पष्ट केले. मात्र त्या घटनेनंतरही जेम्स लेनला संशोधनासाठी मदत करणारे, बदनामीकारक मजकुराला वैचारिक आधार देणारे आणि भारतीय इतिहासाचा अपमान करणाऱ्या संस्थांतील जबाबदार व्यक्तींवर आजपर्यंत ठोस कारवाई झाली नाही, याला संभाजी ब्रिगेडने ‘सरकारी संरक्षणवाद’ असे संबोधले आहे.
न्यायालयीन कारवाई आणि माफीनामा
जेम्स लेन प्रकरणी सातारा न्यायालयात गुन्हा दाखल झाल्यानंतर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसचे माजी संचालक सईद मंजर खान, टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील संस्कृतचे प्राध्यापक डॉ. श्रीकांत बहुलकर, प्रा. सुचिता परांजपे, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे ग्रंथपाल वा. ल. मंजुळ यांच्यासह एकूण दहा जणांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत.
मात्र आता या आरोपींनी आपल्यावरील गुन्हे मागे घ्यावेत किंवा रद्द करावेत, यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला असून, त्यास पाठिंबा देण्यासाठी १७ डिसेंबर २०२५ रोजी लेखी माफीनामा सादर करण्यात आला आहे.
संभाजी ब्रिगेडचे थेट सवाल
संघटनेने उपस्थित केलेले प्रश्न असे आहेत की,
– २२ वर्षे शांत राहिल्यानंतर अचानक माफी कशी सुचली?
– गुन्हा केला नसेल तर माफी कशासाठी?
– माफी म्हणजे गुन्ह्याची कबुली नाही का?
१३ जानेवारीची सुनावणी निर्णायक
या प्रकरणाची महत्त्वाची सुनावणी १३ जानेवारी रोजी होणार असून, हा दिवस इतिहासासाठी निर्णायक ठरणार आहे, असे संभाजी ब्रिगेडचे म्हणणे आहे. माफीनाम्याच्या आधारे कोणत्याही आरोपीला दिलासा देऊ नये, गुन्हे रद्द करण्याचा कोणताही प्रयत्न हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानासमान ठरेल, आणि इतिहासाशी गद्दारी करणाऱ्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी ठाम भूमिका ब्रिगेडने मांडली आहे.
सरकारला थेट इशारा
संभाजी ब्रिगेडने महाराष्ट्र सरकारला थेट सवाल करत विचारले आहे की, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवर कारवाई होणार आहे की नाही? जेम्स लेनला मदत करणाऱ्यांना सरकारी संरक्षण दिले जात आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेण्याची हिंमत सरकारमध्ये आहे का?
जर सरकार गप्प राहिले किंवा आरोपींची सुटका झाली, तर संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरेल, न्यायालयीन लढा लढेल आणि जनतेसमोर सत्य मांडेल, असा स्पष्ट इशारा देत संघटनेने पुन्हा एकदा ठाम भूमिका जाहीर केली आहे.
“माफी नको, शिक्षा हवी!” असा नारा देत संभाजी ब्रिगेडने लढा अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.
