जालिंदर आल्हाट ( जालिंदर आल्हाट अ.नगर संपादक )
अहिल्या नगर : श्रीरामपूर शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोके वर काढले असून, जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणासह गंभीर गुन्ह्यांतील आरोपी आणि सध्या जामिनावर असलेले बंटी उर्फ अस्लम शबीर जहागीरदार यांच्यावर भरदिवसा झालेल्या गोळीबारात त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान कब्रस्तानातील एका अंत्यविधीला उपस्थित राहून परतत असताना बंटी जहागीरदार हे मित्र अमीन हाजी यांच्या दुचाकीवरून घरी निघाले होते. सेंट लूक हॉस्पिटलच्या ओपीडी गेटजवळ पोहोचताच, दबा धरून बसलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी दोन पिस्तुलांमधून त्यांच्यावर बेधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात त्यांच्या छातीच्या दोन्ही बाजूंना, पायाला, पाठीला तसेच कानाजवळून एक गोळी गेली. एकूण सहा गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती आहे.
गोळीबारानंतर बंटी जहागीरदार हे जागीच कोसळले. परिसरातील नागरिकांनी तातडीने त्यांना श्रीरामपूर येथील साखर कामगार दवाखान्यात दाखल केले. तेथे डॉ. रविंद्र जगधने, डॉ. संजय अनारसे व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रथमोपचारासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना कार्डियाक व्हॅनद्वारे नगर येथील साईदीप हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. उपचार सुरू असतानाच सायंकाळी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
घटनेची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरताच कामगार हॉस्पिटल परिसरात मोठ्या प्रमाणात जमाव जमला. संतप्त भावना लक्षात घेता अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्यासह फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. सय्यद बाबा चौक व मौलाना आझाद चौक परिसरातही जमाव जमल्याने पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला.
बंटी जहागीरदार हे श्रीरामपूर नगरपालिकेतील नगरसेवक रईस जहागीरदार यांचे चुलत बंधू होत. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. भरदिवसा झालेल्या या थरारक गोळीबारामुळे श्रीरामपूरातील वाढती गुन्हेगारी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.श्रीरामपूर शहरात सध्या तणावाचे वातावरण असून शहरातील बाजारपेठे बंद झाली आहे.दंगल नियंत्रण पथक व पोलिसांची मोठी कुमक बंदोबस्तासाठी बोलविण्यात आली आहे.देवळाली प्रवरा व राहुरी,राहता येथिल अग्निशमन दल पथकास पाचारण करण्यात आले आहे.


