विशेष प्रतिनिधी
बेवनूर ता. जत २० नोहेंबर गावातील काही शेतकऱ्यांनी विद्यमान तलाठी आंबेकर आणि त्यांच्या कथित खाजगी ड्रायव्हर यांच्यावर अवैध रक्कम स्वीकारल्याचे गंभीर आरोप केले आहेत. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अवकाळी पिकांचे पंचनामा नोंदवून देण्यासाठी तसेच इतर महसूल कामे तातडीने करून देण्यासाठी Google Pay व PhonePe मार्फत पैसे मागितल्याचे दावे करण्यात आले आहेत. काही नागरिकांनी या व्यवहारांचे डिजिटल पुरावे असल्याचा दावा केला आहे.
आरोप उजेडात आल्यानंतर तलाठी आंबेकर यांची धावपळ झाल्याचे ग्रामस्थ सांगतात. प्रकरण चिघळू नये म्हणून आंबेकर यांनी गावातील काही नागरिकांना एकत्र करून, “मला निलंबनापासून वाचवा” अशी विनंती केल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.
तसेच, संबंधित तलाठी यांनी आपल्या नवऱ्याचा उल्लेख करत,
“माझा नवरा पोलीस आहे; हे प्रकरण त्याला सांगितले तर पत्रकारांवर व गावकऱ्यांवर गुन्हा दाखल केला जाईल”
असा इशारा दिल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे.
स्थानिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनीही सांगितले की, फोनवर ऐकेरी भाषेत बोलणे, तसेच काही प्रकरणांमध्ये एखाद्याचे क्षेत्र जुळत नसेल तर अवैध रक्कम घेऊन क्षेत्र जुळवून देण्याचे आश्वासन देणे यासारखे आरोप ग्रामस्थांनी त्यांच्या निदर्शनास आणले आहेत.
पूर्वीच्या तलाठ्यांनी नियमबाह्य असल्याने पेंडिंग ठेवलेली काही कामे, नव्या तलाठींकडे गेल्यावर रक्कम घेऊन पूर्ण केल्याचा दावा नागरिकांकडून करण्यात येत आहे.
या सर्व आरोपांबाबत संबंधित महसूल विभागाकडून अधिकृत भूमिका जाहीर झालेली नाही.
ग्रामस्थ मात्र तहसीलदारांकडे सामूहिक तक्रार देण्याच्या तयारीत असल्याचे समजते.
प्रकरण गंभीर असून, महसूल खात्याने याबाबत तपास सुरू करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
