उत्तम तांबे ( रायगड जिल्हा संपादक )
माणगाव तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नळेफोडी येथे आज शनिवार, दि. ३ जानेवारी २०२६ रोजी थोर समाजसुधारिका, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेतील विद्यार्थीनी नव्या नरेश तुपट हिच्या हस्ते करून करण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक अनिल नाचपल्ले सर यांनी उपस्थित पालक, ग्रामस्थ व विद्यार्थी यांचे मनःपूर्वक स्वागत केले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणविषयक कार्यावर प्रकाश टाकत, स्त्री शिक्षणाचे महत्त्व, समानतेची मूल्ये आणि समाजपरिवर्तनातील शिक्षणाची भूमिका स्पष्ट केली.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे शाळेतील सर्व मुलींनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा परिधान करून त्यांच्या विचारांचा जिवंत प्रत्यय उपस्थितांना दिला. मुलींच्या या सादरीकरणामुळे संपूर्ण परिसर प्रेरणादायी वातावरणाने भारावून गेला.
पालक व ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक करत, अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये महापुरुषांच्या विचारांची ओळख व सामाजिक जाणीव निर्माण होते, अशी भावना व्यक्त केली. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण, स्वाभिमान व सामाजिक बांधिलकीचे संस्कार रुजण्यास निश्चितच मदत झाली, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
नळेफोडी शाळेतील हा उपक्रम सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणारा ठरला.
कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक अनिल नाचपल्ले, शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष प्रकाश धोंडू भावे,उपाध्यक्ष प्रमिला भावे,अंगणवाडी सेविका सुचिता महादे, मदतनीस अन्वीशा तुपट, पालक सलोनी लोखंडे, हरिश्चंद्र गौरू महादे,निशा
नरेश तुपट, सर्व समिती अध्यक्ष पदाधिकारी ग्रामस्थ सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते..
