उत्तम तांबे  ( रा.जि. संपादक )

रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील रा.जि.प. केंद्रशाळा गांगवली या शाळेचा ‘पोस्को महाराष्ट्र स्टील’ कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमांतर्गत पूर्णतः कायापालट करण्यात आला आहे. नूतनीकरण करण्यात आलेल्या या शाळेचा उद्घाटन सोहळा सोमवार, दि. २२ डिसेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी पोस्को कंपनीचे अधिकारी श्री. यौंग हा किम, श्री. महेंद्र तट्टे, माणगावच्या गटशिक्षणाधिकारी सौ. सुरेखा तांबट, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गांगवली ही ५७ विद्यार्थी पटसंख्या असलेली महत्त्वाची केंद्रशाळा आहे. मात्र, गेल्या काही काळापासून या शाळेची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. पावसाळ्यात छत गळणे, भिंतींचे प्लास्टर पडणे आणि नादुरुस्त स्वच्छतागृहे यांमुळे विद्यार्थ्यांना वर्गात बसणेही कठीण झाले होते. शाळेच्या या दुरवस्थेमुळे मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होत होता. ही गरज ओळखून पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनीने शाळेच्या संपूर्ण दुरुस्तीचे काम हाती घेतले आणि अल्पावधीतच शाळेचा चेहरामोहरा बदलून टाकला.

या उपक्रमांतर्गत कंपनीने शाळेचे छप्पर बदलून नवीन पत्रे बसविले, संपूर्ण इमारतीचे आकर्षक रंगकाम केले, तसेच स्वयंपाकघर आणि स्वच्छतागृहांची दर्जेदार दुरुस्ती केली. याशिवाय संपूर्ण शाळेत नवीन इलेक्ट्रिकल फिटिंग आणि प्लंबिंगचे काम करून विद्यार्थ्यांना आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या नवीन रूपामुळे शाळेत आता सुरक्षित आणि प्रसन्न वातावरण निर्माण झाले आहे. येत्या काळात कंपनीमार्फत शाळेला  संगणक सुविधा उपलब्ध करून देण्याचेही नियोजन आहे.

कार्यक्रमावेळी बोलताना गटशिक्षणाधिकारी सौ. सुरेखा तांबट म्हणाल्या की, “पोस्को कंपनीने केलेल्या या दुरुस्तीमुळे मुलांसाठी एक अतिशय सुरक्षित शैक्षणिक वातावरण तयार झाले आहे. जो उत्साह आधी मुलांमध्ये दिसत नव्हता, तो आता त्यांच्या आनंदी चेहऱ्यांवरून स्पष्ट जाणवत आहे. पोस्को ने शाळेला नवे रूप दिले आहे. आता शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी या सुंदर वास्तूचा योग्य उपयोग करून अभ्यासात प्रगती साधत या कार्याची पोहोचपावती द्यायची आहे. शिक्षण विभागाच्या वतीने आम्ही या सामाजिक कार्याचे कौतुक करतो आणि भविष्यातही अशीच मदत मिळेल, अशी आशा व्यक्त करतो.” मुख्याध्यापकांनीही कंपनीने तातडीने दखल घेऊन काम पूर्ण केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

पोस्को कंपनीचे अधिकारी श्री. यौंग हा किम यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले की, “आज विद्यार्थ्यांनी केलेले स्वागत पाहून मी भारावून गेलो आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी उत्तम शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यात योगदान देण्याचा पोस्को परिवाराला सार्थ अभिमान आहे. आमची इच्छा आहे की तुम्ही मन लावून अभ्यास करावा आणि भारताचे जबाबदार नागरिक म्हणून नाव कमवावे.”

यावेळी काही पालक आणि विद्यार्थ्यांनीही आपली मनोगते व्यक Mत केली. पालकांनी सांगितले की, आर्थिक अडचणींमुळे गावपातळीवर शाळेची दुरुस्ती करणे अशक्य होते, मात्र पोस्कोच्या दातृत्वामुळे आज आमच्या मुलांचे भविष्य सुरक्षित झाले आहे. विद्यार्थ्यांनीही आपली “सुंदर शाळा” पाहून आनंद व्यक्त केला असून, या मोकळ्या आणि स्वच्छ वातावरणात अधिक जोमाने अभ्यास करण्याचा संकल्प केला. ही पोस्कोने नुतनीकरण केलेली १६ वी शाळा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed