भुषण  शिसोदे 

( रायगड जिल्हा क्राईम रिपोर्टर )

माणगाव  : अशोक दादा साबळे विद्यालय व माणगाव ज्युनिअर कॉलेज, माणगाव येथील प्राचार्य श्री. डी. एम. जाधव सर हे ३१ डिसेंबर २०२५ रोजी नियत वयमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांच्या ३३ वर्षे ३ महिने २३ दिवसांच्या निष्ठावान व उल्लेखनीय सेवेनिमित्त संस्था व कर्मचाऱ्यांच्या वतीने शनिवार, दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी सायं. ४ वाजता सेवापूर्ती स्वागत व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

सन १९९२ पासून शिक्षक म्हणून सेवेला सुरुवात करून त्यांनी पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक व प्राचार्य म्हणून कार्य केले. त्यांच्या कार्यकाळात शाळा व कॉलेजमध्ये शैक्षणिक, क्रीडा व भौतिक सुधारणा झाल्या असून अनेक विद्यार्थी क्रीडा क्षेत्रात राज्यस्तरापर्यंत पोहोचले.

मूळचे आंबेवाडी येथील असलेल्या जाधव सर यांचे शिक्षण आंबेवाडी, औराद, उदगीर, उमरगा तसेच छत्रपती संभाजीनगर व लातूर येथे झाले. शिक्षणाबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. उत्कृष्ट वक्ते व सूत्रसंचालक म्हणून त्यांची ओळख असून शिक्षक-कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष, सचिव व सल्लागार तसेच पंचायत समितीचे शिक्षण सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.

सन २०१६ मधील कोपर्डी घटनेनंतर मराठा क्रांती मूक मोर्चाचे माणगाव येथील नेतृत्व त्यांनी केले. सन २००७ मध्ये मराठा कर्मचारी मित्र मंडळाची स्थापना करून माणगाव येथे शिवजयंती महोत्सव अखंड सुरू ठेवण्यात त्यांचे योगदान आहे.

त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना ‘माणगाव रत्न’, आदर्श मुख्याध्यापक/प्राचार्य तसेच आदर्श शिक्षक कोकणरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. जाधव सरांच्या पुढील सेवानिवृत्त आयुष्यासाठी सर्व स्तरातून शुभेच्छा व्यक्त होत आहेत.
हरहुन्नरी सेवा निवृत्त सत्कारमूर्ती माणगांव अशोक दादा साबळे विद्यालयाचे प्राचार्य डी. एम. जाधव सर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed