शुभांगी वाघमारे
पुणे : कोरेगाव भीमा येथील जयस्तंभास अभिवादनासाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीचा गैरफायदा घेत तसेच बसस्टॉप व इतर गजबजलेल्या ठिकाणी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला पुणे शहर गुन्हे शाखा युनिट–६ ने जेरबंद केले आहे. या कारवाईत तब्बल २० लाख ४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून ६ चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
पुणे शहरात महिलांच्या दागिन्यांच्या चोरीच्या घटनांना आळा घालण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आदेश प्राप्त झाले होते. त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट–६ कडील पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे व पोलीस अंमलदार कारखेले, मुंडे, साळवे, ताकवणे, व्यवहारे यांच्या पथकाने सातत्याने गोपनीय माहिती संकलित करून संशयित आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवले.
दि. १८ डिसेंबर २०२५ रोजी मिळालेल्या गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे पथकाने कारवाई करत सुभाष चंद्रकांत जाधव (वय ३९, रा. शिरापूर धुमाळ, ता. शिरूर, जि. बीड / कालिकानगर, जि. बीड) आणि लहु संतराम गायकवाड (वय ३०, रा. रायमोह, ता. शिरूर, जि. बीड) या दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता एकूण १६७ ग्रॅम वजनाचे, अंदाजे २०,०४,००० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.
या आरोपींकडून पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले खालील गुन्हे उघडकीस आले आहेत.
वाघोली पोलीस ठाणे (गु.रं.नं. 500/2025), लोणीकंद पोलीस ठाणे (गु.रं.नं. 06/2025 व 07/2025), लोणी काळभोर पोलीस ठाणे (गु.रं.नं. 306/2025), हडपसर पोलीस ठाणे (गु.रं.नं. 1307/2024) व स्वारगेट पोलीस ठाणे (गु.रं.नं. 182/2025) येथील गुन्हे असून सर्व गुन्हे भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अंतर्गत दाखल आहेत.
ही यशस्वी कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे व मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. गुन्हे शाखा युनिट–६ कडील पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे तसेच पोलीस अंमलदार कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, बाळासाहेब सकटे, विनायक साळवे, सारंग दळे, गिरीष नाणेकर, सुहास तांबेकर, ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे, नितीन धाडगे, सोनाली नरवडे व प्रतिक्षा पानसरे यांनी ही कारवाई केली.
या कारवाईमुळे पुणे शहरातील महिलांच्या मंगळसूत्र चोरीच्या गुन्ह्यांवर मोठ्या प्रमाणात आळा बसणार असून पुढील तपास सुरू आहे.
