अजित काळेल ( सातारा जिल्हा संपादक )

रहिमतपूर (जि. सातारा)  कायद्याचा धाक केवळ शब्दांत नसतो, तो कृतीतून सिद्ध करावा लागतो… आणि तेच रहिमतपूर पोलिसांनी करून दाखवले आहे. निर्जन ठिकाणी लिफ्टच्या बहाण्याने मारहाण करून सोन्याची चैन लुटणाऱ्या आरोपीला अवघ्या आठ तासांत बेड्या ठोकत पोलिसांनी वेग, बुद्धिमत्ता आणि समन्वय यांचा अप्रतिम संगम साकारला आहे. तब्बल २,६९,१३२ रुपये किंमतीची १६.९ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन जप्त करून तपासाला यशस्वी पूर्णविराम देण्यात आला.

दि. २१ फेब्रुवारी २०२६ रोजी अजय विठ्ठल गाडे (रा. रहिमतपूर) हे दुचाकीवरून कोरेगावकडे जात असताना एका अज्ञात इसमाने लिफ्ट मागितली. परतीच्या प्रवासात मौजे दुघी (ता. कोरेगाव) येथील निर्जन ठिकाणी गाडी थांबवून त्या इसमाने अचानक हल्ला करत गाडे यांच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २०/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०९(६) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कोरेगाव राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक विनोद नेवसे यांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली.

तपासातील अचूकता आणि टीमवर्कची ताकद
दोन विशेष पथके तयार करून घटनास्थळाचा बारकाईने अभ्यास, सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण आणि तांत्रिक माहितीचा वापर करण्यात आला. पोलीस कॉन्स्टेबल महेश देशमुख यांच्या तांत्रिक कौशल्यामुळे आरोपीचा माग काढण्यात यश आले. सुरुवातीला दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला कसून चौकशीत अखेर गुन्ह्याची कबुली द्यावी लागली. चोरीस गेलेली संपूर्ण सोन्याची चैन जप्त करण्यात आली.

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे, हेड कॉन्स्टेबल सचिन माने, प्रविण बर्गे, पोलीस नाईक सुशांत शिंदे, कॉन्स्टेबल दिपक देशमुख, तुषार काळंगे यांचे योगदान उल्लेखनीय ठरले.

नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना दृढ
रहिमतपूर पोलिसांची ही वेगवान आणि परिणामकारक कारवाई केवळ एका गुन्ह्याचा उलगडा नसून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांची बांधिलकी अधोरेखित करणारी आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पथकाचे विशेष अभिनंदन केले असून, “गुन्हा कराल तर सुटका नाही” हा स्पष्ट संदेश गुन्हेगारांपर्यंत पोहोचला आहे.
रहिमतपूर पोलिसांची ही कामगिरी सातारा जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रेरणादायी ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed