नेताजी खराडे ( दौंड तालुका प्रतिनिधी )
पाटस येथे हॉटेल व्यावसायिकाला जीवे मारण्याच्या धमक्या
जबरदस्तीने ताबा घेण्याचा प्रयत्न; पोलिसांकडे तक्रार दाखल
पाटस, ता. दौंड, जि. पुणे | प्रतिनिधी
पाटस परिसरातील एक हॉटेल व्यावसायिकाला काही व्यक्तींनी दमदाटी करत हॉटेल बंद करण्याची व जबरदस्तीने ताबा घेण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित व्यावसायिकाने यवत पोलीस स्टेशनसह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार अर्ज दाखल केला आहे.
तक्रारदार श्री. अमोल विक्रम तांडळे, रा. पाटस, ता. दौंड, जि. पुणे हे मागील सुमारे २५ वर्षांपासून पाटस येथील नागनाथ तलावाजवळील हॉटेल व्यवसाय चालवत आहेत. हॉटेलची लाईटबिल व पाणीपट्टी त्यांच्या स्वतःच्या नावावर असल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे. सदर हॉटेल हे त्यांच्या कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
जबरदस्ती व धमक्यांचा आरोप
तक्रारीनुसार,
वसंत निवृत्ती पानसरे ,सुनील धनंजय पवार ,साहील वसंत पानसरे ,विजय निवृत्ती पानसरे आणि इतर काही व्यक्तींनी हॉटेल पुढे चालवू नये, अन्यथा जीसीबीद्वारे उखडून टाकू अशी धमकी दिली आहे.
तसेच विरोध केल्यास मारहाण करण्याची, शिवीगाळ करण्याची व खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे. संबंधित व्यक्तींनी गावातील मुलांमार्फत वारंवार धमक्या दिल्याचेही अर्जात नमूद आहे.
जीवितास धोका असल्याची भीती
सदर प्रकारामुळे आपला व्यवसाय बंद पडण्याची व स्वतःच्या जीवितास धोका निर्माण झाल्याची भीती तक्रारदाराने व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करावी व आपल्या हॉटेल व्यवसायाचे संरक्षण करावे, अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अर्ज
ही तक्रार खालील अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आली आहे —
मा. पोलीस निरीक्षक, यवत पोलीस स्टेशन
मा. पोलीस उपविभागीय अधिकारी, दौंड विभाग
मा. पोलीस अधीक्षक (ग्रामीण), पुणे
पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती चौकशी करून कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
