नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर )

मो.नं.  70281 92140

यवत परिसरात एक धक्कादायक आणि थरारक घटना उघडकीस आली असून, किरकोळ वादातून एका पानटपरी चालकावर तलवारीने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रविण नंदू दोरगे (वय 28, व्यवसाय – पान शॉप, रा. यवत) हे दिनांक 4 मे 2026 रोजी रात्री सुमारे 8.15 वाजण्याच्या सुमारास आपल्या दुकानात काम करत होते. यावेळी त्यांच्या दुकानासमोर काही इसमांमध्ये भांडण सुरू होते. सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून फिर्यादीने त्यांना वाद न करण्याचे आवाहन केले. यामुळे संबंधित इसम तेथून निघून गेले.

मात्र, काही वेळानंतर आरोपींनी परत येत “तू आमच्या भांडणात मध्यस्थी का केली?” असा जाब विचारत शिवीगाळ व दमदाटी केली. याच रागातून आरोपी क्रमांक 1 यश दीपक मोहीते (रा. आमराई, बारामती) याने “आज तुला जिवंत सोडणार नाही” अशी धमकी देत हातातील तलवारीने फिर्यादीच्या गळ्यावर वार केला. फिर्यादीने तत्परता दाखवत वार चुकवला, मात्र त्यांच्या डाव्या हाताच्या पंजाला गंभीर जखम झाली.

याच वेळी आरोपी क्रमांक 2 अनिकेत केशवकुमार नामदास (रा. भवानीनगर, इंदापूर) याने फिर्यादीवर दगडफेक केली. जीव वाचवण्यासाठी फिर्यादी पळत असताना, एका अज्ञात वाहनचालकाने भरधाव वेगात गाडी चालवत त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. मात्र, फिर्यादीने वेळेत बाजूला उडी घेतल्याने मोठा अनर्थ टळला.

या प्रकरणी यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. 417/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 109, 352, 351(2), 351(3), 3(5) तसेच शस्त्र अधिनियम कलम 4, 25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेत फिर्यादी स्वतः जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक मारुती मेतलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, पोलीसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.

सामाजिक जबाबदारी पार पाडणाऱ्या व्यक्तीवरच जीवघेणा हल्ला होणे ही अत्यंत गंभीर बाब असून, कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *