नेताजी खराडे (  क्राईम रिपोर्टर )

मो. नं. :  70281 92140

केडगाव, ता. दौंड : केडगाव परिसरात खडकवासला पाटबंधारे विभागाच्या बेबी कालव्याची बेकायदेशीर तोडफोड करण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कालवा फोडल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने परिसरात दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि विद्युत अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कालवा निरीक्षक महेश देवकाते आणि हनुमंत थोरात यांनी जेसीबीच्या सहाय्याने हा कालवा फोडल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच, यवत पाटबंधारे विभागाचे उपअभियंता सचिन पवार यांनी यासाठी परवानगी दिल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. मात्र, या संपूर्ण प्रकाराबाबत अधिकृत खुलासा अद्याप करण्यात आलेला नाही.

कालवा फोडल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी परिसरात पसरले असून ते संथ स्वरूपात साचून राहत आहे. परिणामी, परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. वाढलेल्या डासांमुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका वाढला असल्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. विशेषतः कालव्यालगत राहणाऱ्या कुटुंबांचे दैनंदिन जीवन यामुळे त्रस्त झाले आहे.

या प्रकरणातील सर्वात धोकादायक बाब म्हणजे, कालव्याच्या अगदी शेजारी महावितरण विभागाची डीपी (विद्युत जनित्र) उभी आहे. साचलेल्या पाण्यामुळे त्या डीपीमधून पाण्यात विद्युत प्रवाह उतरत असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. परिसरात वारंवार ठिणग्या उडत असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

स्थानिक रहिवासी पांडुरंग बाबुराव शिंगाडे यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करताना सांगितले की, “आमच्या घराशेजारी जेसीबीने कालवा फोडण्यात आला. डीपीजवळ पाणी साचल्याने करंट उतरत आहे. रोज स्पार्किंग होत आहे. जवळच शाळा असल्याने लहान मुले याच मार्गाने ये-जा करतात. उद्या एखादी दुर्घटना घडली, तर त्याला जबाबदार कोण?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कालवा फोडण्याचा इशारा दिला होता. त्यावेळी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी कठोर कारवाईचा इशारा दिला होता. मात्र, आता अधिकाऱ्यांवरच कालवा फोडल्याचा आरोप होत असल्याने “सामान्य नागरिकांसाठी एक नियम आणि अधिकाऱ्यांसाठी दुसरा नियम का?” असा प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच तात्काळ दुरुस्ती करून परिसरातील धोकादायक परिस्थिती दूर करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *