नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर )

संपर्क  दूरध्वनी क्रमांक : 70281 92140

पुणे, दि. 02/06/026

पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी हातभट्टी दारू सेवनामुळे झालेल्या नागरिकांच्या मृत्यू प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच या बेकायदेशीर व्यवसायामागील संपूर्ण साखळीचा पर्दाफाश करण्यात यावा, या मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीने पुण्याचे पोलीस आयुक्त मा. रितेश कुमार साहेब यांना देण्यात आले.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे महानगराध्यक्ष अविनाश मोहिते म्हणाले की, “पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात घडलेली विषारी हातभट्टी दारूची घटना अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक आहे. या घटनेत अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. ही केवळ दुर्घटना नसून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि बेकायदेशीर धंद्यांना मिळणाऱ्या संरक्षणामुळे घडलेली गंभीर बाब आहे.

हातभट्टीचे अड्डे, विषारी रसायनांचा पुरवठा, वाहतूक आणि विक्री यामागे कार्यरत असलेली संपूर्ण साखळी शोधून काढणे अत्यावश्यक आहे. केवळ काही आरोपींना अटक करून प्रकरण संपविण्याऐवजी या व्यवसायाला संरक्षण देणारे आणि त्यातून लाभ घेणारे सर्व संबंधित घटक उघड झाले पाहिजेत. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून हातभट्टीच्या अड्ड्यांवर कायमस्वरूपी कारवाई करण्यात यावी.”

तसेच मृतांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, दोषींवर कठोर शिक्षा व्हावी आणि संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावरही योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी सिद्धार्थ कोंढाळकर (जिल्हाध्यक्ष, पुणे मध्य), ज्योतिबा नरवडे (वरिष्ठ उपाध्यक्ष, पुणे शहर), अविनाश घोडके, नरेश पडवळ, स्वप्निल रायकर आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *