नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर )

मो. नं. : 70281 92140

केडगाव : प्रशासनाचा ढिसाळ कारभार आणि अधिकाऱ्यांचे कमालीचे दुर्लक्ष यामुळे केडगाव येथील इरिगेशन कॉलनी आता मृत्यूचा सापळा बनू लागली आहे. २७ जून रोजी रात्री ९:४५ च्या सुमारास याच कॉलनीतील पडीक खोल्यांमध्ये एका ४० वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, आतापर्यंत या समस्येकडे डोळेझाक करणाऱ्या सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
  

गेल्या अनेक वर्षांपासून इरिगेशन कॉलनीतील काही खोल्या अत्यंत दुरवस्थेत आणि पडीक अवस्थेत आहेत. या खोल्या पाडून टाकण्यासाठी येथील रहिवाशांनी यापूर्वीच्या शाखाधिकाऱ्यांकडे अनेकदा लेखी पत्रव्यवहार केला, विनंत्या केल्या. पण, ‘सरकारी काम आणि महिना थांब’ या उक्तीप्रमाणे सुस्त प्रशासनाने या पत्रांना थेट कचऱ्याची टोपली दाखवली.

परिणामी, आज या पडक्या खोल्यांमध्ये अवैध धंदे आणि दारूबाजांचा सुळसुळाट झाला आहे. अंधाराचा फायदा घेऊन येथे जादूटोणा आणि अश्लील प्रकार सर्रास सुरू असतात. आता तर या जागेचा वापर आत्महत्येसारख्या गंभीर कृत्यांसाठी होऊ लागला आहे.
  

या सरकारी वसाहतीमध्ये राहणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. कॉलनीतील महिलांना दिवसा ढवळ्या घराबाहेर पडणे किंवा घरात एकटे राहणे अशक्य झाले आहे. “आम्ही कुटुंबासह येथे राहतो की गुन्हेगारांच्या छायेखाली?” असा संतप्त सवाल येथील रहिवासी विचारत आहेत. एका बाजूला कायदा आणि सुव्यवस्थेच्या गप्पा मारायच्या आणि दुसऱ्या बाजूला शासकीय जागेतच गुन्हेगारीला खतपाणी घालायचे, असा हा दुटप्पी कारभार सुरू आहे.
  

यापूर्वीच्या अधिकाऱ्यांनी जी घोडचूक केली, तीच चूक आताच्या शाखाधिकारी व सहाय्यक अभियंता श्रेणी २, रोहिणी पासलकर करणार का? आणखी किती बळी गेल्यानंतर या पडक्या खोल्यांवर हातोडा पडणार? येथील महिला सुरक्षित नसतील, तर या पदाचा काय फायदा?
“आता केवळ आश्वासन चालणार नाही. येथील शासकीय कर्मचाऱ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन, त्या पडीक खोल्या तात्काळ जमीनदोस्त करण्यात याव्यात. जर प्रशासनाने तात्काळ पावले उचलली नाहीत, तर येत्या काळात या निष्पाप नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed