स्मिता बाबरे ( मुख्य संपादिका )
दि. 22 / 08 / 2026
लातूर : शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन , लातूर येथे आज सकाळी ८ ते १० या वेळेत विद्यार्थिनींसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास तब्बल ८५० विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थिनींना नियमितपणे देण्यात येणाऱ्या कराटे व स्वसंरक्षण प्रशिक्षणासोबतच शिक्षण, करिअर, स्पर्धा परीक्षा, सायबर सुरक्षितता आणि व्यक्तिमत्त्व विकासाबाबत मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी लातूरचे पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी विद्यार्थिनींशी तब्बल दोन तास संवाद साधत अत्यंत सोप्या, प्रभावी आणि मनमोकळ्या भाषेत विविध विषयांवर मार्गदर्शन केले. मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी विद्यार्थिनींना “प्रथम शिक्षण पूर्ण करा, त्यानंतर स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडा” असा महत्त्वपूर्ण सल्ला दिला. सध्या ज्या अभ्यासक्रमाचे किंवा डिप्लोमाचे शिक्षण घेत आहात, त्यामध्ये पूर्ण लक्ष केंद्रित करून शैक्षणिक पाया मजबूत करणे आवश्यक आहे. पदवी अथवा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर आपल्या आवडीच्या क्षेत्राचा विचार करून स्पर्धा परीक्षेची योग्य दिशा निश्चित करावी. कोणत्याही क्षेत्रात यश मिळविण्यासाठी सातत्य, नियोजन आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
“कराटेच्या माध्यमातून तुम्ही शारीरिकदृष्ट्या सक्षम होत आहात, ही अत्यंत चांगली बाब आहे; मात्र आजच्या डिजिटल युगात शारीरिक सामर्थ्यासोबतच मानसिक आणि डिजिटल सुरक्षितताही तितकीच महत्त्वाची आहे,” असे सांगत त्यांनी विद्यार्थिनींना सोशल मीडियाच्या वापराबाबत विशेष दक्ष राहण्याचे आवाहन केले. अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारणे, वैयक्तिक माहिती किंवा फोटो अनावश्यकपणे सोशल मीडियावर शेअर करणे, तसेच ऑनलाइन व्यवहार करताना निष्काळजीपणा करणे टाळावे. सायबर फसवणूक आणि सोशल मीडिया गैरवापराच्या घटनांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी सतर्कता आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी विद्यार्थिनींना आई-वडिलांनी ठेवलेल्या विश्वासाची जाणीव ठेवून आपल्या शिक्षणावर आणि करिअरवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. कुटुंबीय मोठ्या विश्वासाने मुलींना शिक्षणासाठी बाहेर पाठवतात. हा विश्वास कायम ठेवत स्वतःचे ध्येय निश्चित करून आत्मविश्वासाने पुढे जाणे आणि यशस्वी करिअर घडविणे, हेच विद्यार्थिनींचे प्रमुख ध्येय असावे, असे त्यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थिनींमध्ये शिक्षण, करिअर, स्वसंरक्षण आणि सायबर सुरक्षिततेबाबत नवी दिशा व आत्मविश्वास निर्माण झाला, अशी भावना प्राचार्यांनी व्यक्त केली. अत्यंत व्यस्त दिनक्रमातून दोन तासांचा अमूल्य वेळ देऊन विद्यार्थिनींशी थेट संवाद साधल्याबद्दल शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतनच्या वतीने पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे आभार मानण्यात आले.

या कार्यक्रमामुळे शासकीय महिला तंत्रनिकेतन येथील ८५० विद्यार्थिनींना केवळ स्वसंरक्षणाचे धडेच नव्हे, तर शिक्षण, करिअर नियोजन, स्पर्धा परीक्षा आणि डिजिटल युगातील सुरक्षिततेची महत्त्वपूर्ण शिकवण मिळाली.
